पर्वती टेकडीवर प्रेम युगुलाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:57 IST2022-11-23T17:57:24+5:302022-11-23T17:57:32+5:30

कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील घड्याळ, मोबाईल, सोन्याची साखळी, रोख रक्कम असा ५८ हजार ४३९ रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला

On the mountain hill couple was threatened | पर्वती टेकडीवर प्रेम युगुलाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले

पर्वती टेकडीवर प्रेम युगुलाला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले

पुणे : पर्वती टेकडीवर फिरायला गेलेल्या एका युगुलाला भर दुपारी कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी सराईत गुंडासह दोघांना अटक केली आहे. सचिन अर्जुन भिसे (वय २५) आणि चेतन गणेश यलमेळी (वय २२, दोघेही रा. तळजाई माता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खराडी येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पर्वती टेकडीमागे मंगळवारी दुपारी घडली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आपल्या मित्राबरोबर पर्वती टेकडीच्या मागे फिरायला गेले होते. एका ठिकाणी ते थांबले असताना दोघे चोरटे तेथे आले. त्यांनी फिर्यादींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील घड्याळ, मोबाईल, सोन्याची साखळी, रोख रक्कम असा ५८ हजार ४३९ रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच मित्राच्या डोक्यात कोयत्याने मारून जबर जखमी केले. आरडाओरडा केल्यानंतर तेथून ते पळून जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले.

चेतन येलमेळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिस उपनिरीक्षक कामठे तपास करीत आहेत. यापूर्वी पाषाण, सूस खिंड तसेच वेताळ टेकडी, हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या युगुलांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Web Title: On the mountain hill couple was threatened