कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:34 IST2025-08-23T10:33:41+5:302025-08-23T10:34:50+5:30

महापालिकेचे जे अधिकारी, कर्मचारी वेळेत कामावर येऊन शिस्त पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता

Office hours are 9.45 am officers present at 12 noon show cause notices issued to 500 people arriving late in Pune Municipal Corporation | कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस

कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५; अधिकारी १२ वाजता हजर, लेट येणाऱ्या ५०० जणांना कारणे दाखवा नोटीस

पुणे: महापालिकेत कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. यामध्ये वर्ग १ ते वर्ग चार मधील सुमारे ५०० पेक्षा अधिक जणांचा समावेश असून, या सर्वांना उशिरा आल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिकेचे जे अधिकारी, कर्मचारी वेळेत कामावर येऊन शिस्त पाळणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला होता. त्यानुसार आता कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी देखील महापालिका आयुक्तांनी उशिरा येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळ पाळण्याची तंबी दिली होती. त्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचे समोर आले होते.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. त्यासाठी पालिकेकडून रोजच्या कामाच्या तासात वाढ करून शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही विभागप्रमुख आणि कर्मचारी दिलेल्या वेळेचे पालन करत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने महापालिकेत उशिरा आलेल्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. त्यांच्या नावांची नोंद घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली.

यामध्ये सहा विभागप्रमुखांसह ५०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. महापालिकेची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ वाजता सुरू होते. मात्र, यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी दहा ते बारा वाजून गेल्यानंतरही कार्यालयात येत होते. जे कर्मचारी, अधिकारी उशिरा आले त्यांच्या वेळेची नोंद घेत. त्यांना उशिरा आल्याची नोटीस देण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Office hours are 9.45 am officers present at 12 noon show cause notices issued to 500 people arriving late in Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.