शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:37 AM2019-01-29T11:37:16+5:302019-01-29T11:44:52+5:30

खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

no water left for farming in summer season : The Khadakvasla dam water reservoir is insufficient | शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

Next
ठळक मुद्देपुणेकरांनंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोष उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावरपाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता

पुणे : पुणे शहरासह दौंड, इंदापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शिल्लक पाणी आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्याचा निर्णय जलसंपदाच्या खडकवासला विभागाने घेतला असल्याचे समजते. पुणे शहराला २८ फेब्रुवारीपर्यंत लागणारे पाणी लक्षात घेता उर्वरित शिल्लक पाणी साठ्यातून  दौंड, इंदापूरसह सुमारे ३५ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. 
उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावर घेण्यात येतो. पुण्याला लागणारे पाणी बाजूला ठेवले तर फक्त अडीच टीएमसी पाणी धरणात शिल्लक रहाते. पुण्याच्या पाण्यात दर गुरूवारी कपात केल्यानंतरचा हा हिशोब आहे. या अडीच टीएमसी पाण्यात शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. पाण्याचे सगळे नियोजन आता पिण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊनच करण्यात येत आहे. त्यामुळेच शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तनावर संक्रात आली आहे. 
खडकवासला धरणासाखळीत (खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर) मागीलवर्षी याच काळात २०. १२ टीएमसी होते. यंदा फक्त १५.१२ टीएमसी आहे. त्यामुळेच जलसंपदाचे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळेच गेले महिनाभर जलसंपदाकडून पुणे शहराला पाणी कपात करण्याबाबत आग्रह धरण्यात येत होता. त्यासाठी तीन वेळा पंप बंद करण्याची कारवाईही करण्यात आली. पुणे शहराला ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. याचा अर्थ त्यांनी दररोज फक्त ८९२ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घ्यायचे आहे. प्रत्यक्षात मात्र पालिका रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे.
 इतके पाणी मिळूनही संपुर्ण शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करताना पालिकेची दमछाक होत आहे. मात्र आता पाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसे थेट जाहीर न करता दर गुरूवारी पाणी पुुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यादिवशी १३५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. आठवड्यातून एकदा १३५० म्हणजे महिनाभरात ५ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. हा निर्णय महापालिका व जलसंपदा यांनी स्थानिक स्तरावर घेतला असल्यामुळे २५ जानेवारीला पुण्याच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत जलसंपदा व महापालिका पदाधिकाºयांची मुबंईला होणारी बैठक झालीच नाही. 
  

Web Title: no water left for farming in summer season : The Khadakvasla dam water reservoir is insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.