Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:16 IST2025-11-14T15:13:14+5:302025-11-14T15:16:55+5:30
Nitin Gilbile Video: पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हत्या करून आरोपी फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
Nitin Gilbile Pune: पिंपरी चिंचवडमधील चऱ्होलीतील वडमुखवाडी येथे एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कारमध्ये बसलेल्या नितीन गिलबिले यांना मित्रांनीच गोळ्या घालून संपवले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या शोधात पाच पथके रवाना केली होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लोणावळ्यातून एका आरोपीला अटक केली आहे.
१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नितीन गिलबिले यांची हत्या करण्यात आली. नितीन गिलबिले यांना आधी कारच्या समोरच्या सीटवर बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
नितीन यांचे भाऊ सचिन शंकर गिलबिले (वय ४०) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित जीवन पठारे (रा. पठारे मळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) यांच्या विरोधात गुरुवारी (१३ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विक्रांत ठाकूरला लोणावळ्यात पकडलं
पिंपरी चिंचवड पोलिसांची पाच पथके आरोपींच्या शोध घेत होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आरोपी विक्रांत ठाकूर लोणावळ्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिघी पोलिसांच्या पथकाने लोणावळ्यातील अँबीव्हॅलीतून विक्रांत ठाकूरला अटक केली. पोलीस विक्रांत ठाकूरची चौकशी करत असून, अमित पठारे अद्याप फरार आहे.
सगळं प्रकरण काय?
नितीन गिलबिले हे जमीन खरेदी-विक्रीचे काम करायचे. काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर त्यांनी हॉटेलही सुरू केले होते. व्यावसायिक गाळे बांधून ते भाड्याने दिले होते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी नितीन गिलबिले हे खडी मशीन रस्त्यावर काही लोकांसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी संशयित कार घेऊन आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि नितीन यांच्या हॉटेलच्या दिशेने निघून गेले.
संशयितांनी नितीन यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयितांनी नितीन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून संशयित कार घेऊन पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे.