Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
By किरण शिंदे | Updated: October 29, 2025 22:20 IST2025-10-29T22:15:58+5:302025-10-29T22:20:16+5:30
Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे.

Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
-किरण शिंदे, पुणे
Nilesh Ghaiwal Cases: कुख्यात गँगस्टर निलेश गायवळच्या आर्थिक साम्राज्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. अवघ्या तीन वर्षांत गायवळने तब्बल ५८ एकर जमीन खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे. ही जमीन त्याने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
निलेश गायवळने २०२२ ते २०२५ या काळात जामखेड परिसरातील १२ वेगवेगळ्या व्यक्तींकडून जमीन खरेदी केली आहे. या व्यवहारांची किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांनी आधीच गायवळ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची १० बँक खाती गोठवली आहेत. तपासात असे दिसून आले आहे की, जमीन खरेदीसाठी त्याने आपल्या टोळीचा प्रभाव वापरला असावा.
गुन्ह्यातून मिळवलेले पैसे पांढरे करण्यासाठी (मनी लॉन्ड्रिंग) या खरेदीचा वापर केला, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पुणे पोलिस लवकरच अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) तपासासाठी पत्र पाठवणार आहेत.
याशिवाय गायवळने धाराशीव व बीड जिल्ह्यातील सोलार प्रकल्पांचे टेंडर मिळविल्याचंही समोर आलं आहे. या टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार झाले का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी संबंधित कंपन्यांकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.