निखिल दीक्षित ठरला ‘लोकमत चेस मास्टर’

By Admin | Updated: July 2, 2014 02:44 IST2014-07-02T02:44:59+5:302014-07-02T02:44:59+5:30

काळ्या आणि पांढऱ्या घरांमध्ये सोंगट्यांच्या बलाढ्य सैन्यासह एकमेकांवर आक्रमण करीत निखिल दीक्षित हा ‘लोकमत चेस मास्टर’ ठरला

Nikhil Dikshit becomes 'Lokmat Chase Master' | निखिल दीक्षित ठरला ‘लोकमत चेस मास्टर’

निखिल दीक्षित ठरला ‘लोकमत चेस मास्टर’

पुणे : काळ्या आणि पांढऱ्या घरांमध्ये सोंगट्यांच्या बलाढ्य सैन्यासह एकमेकांवर आक्रमण करीत निखिल दीक्षित हा ‘लोकमत चेस मास्टर’ ठरला. चिमुकल्यांपासून ते तरुणाईपर्यंत शेकडो ग्रँडमास्टर्सचा ‘चेक-मेट’चा खेळ मोठ्या उत्साहात रंगला. अगदी साडेचार वर्षांच्या छोट्या खेळाडूंनीही चेस बोर्डवर खेळी करीत उपस्थितांना थक्क केले.
निमित्त होते, ‘लोकमत’ व डेन्टो शाईन छोटा भीम ओरल केअर फॉर किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने व कुमार पॅसिफिक मॉल यांच्या सहयोगाने ‘लोकमत चेस मास्टर्स आॅफ पुणे’ स्पर्धेचे. पुणे चेस असोसिएशनच्या सहकार्याने, तसेच पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या मान्यतेने स्पर्धा घेण्यात आली. शंकरशेठ रस्त्यावरील कुमार पॅसिफिक मॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेला पुणे चेस असोसिएशनचे खजिनदार केतन खैरे, पवन कातकडे, पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलचे सेक्रेटरी निरंजन गोडबोले, शेखर जोरी आदी उपस्थित होते. तर, द्वितीय क्रमांक मयूर मोघे आणि तृतीय क्रमांक मानस पंडित यांनी पटकाविला.
पुण्यासह सातारा, बारामती, जुन्नर, नारायणगाव, लोणावळा आदी ठिकाणांहून सुमारे ४०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता सुरू झालेली चुरशीची स्पर्धा संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. एकाच वेळी ३०० स्पर्धकांनी चेस बोर्डवर एकमेकांविरुद्ध युद्ध खेळत आपल्या बुद्धीचा कस लावला.
अगदी साडेचार वर्षांपासून ते ९ वर्षांपर्यंत, ९ ते १५ वर्षे आणि १५ ते २६ वर्षे अशा गटांमध्ये मुलांसोबत मुलींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तरुणांप्रमाणेच चिमुकल्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. प्रत्येक खेळी, प्रत्येक प्यादे हलविताना विचार करणारे हे चिमुकले उद्याचे ग्रँडमास्टर होणार, असेच चित्र दिसत होते.
अनेक खेळाडू खेळी करताना वहीमध्ये नोंद ठेवत मोठ्या हुशारीने पुढे वाटचाल करीत होते. या वेळी कुमार पॅसिफिक मॉलचे मंकेश्वर पांडे, सबिता अगरवाल, डेन्टो शाईनचे विजय मौर्य, सचिन साळवे आदी उपस्थित होते. संदीप वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Nikhil Dikshit becomes 'Lokmat Chase Master'