राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 20:36 IST2019-05-10T20:35:37+5:302019-05-10T20:36:24+5:30
पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी
पुणे : पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी पालिकेतील विराेधीपक्ष नेते दिलीप बराटे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित हाेते.
राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्यासाठी लाेकांना 5 ते 10 किलाेमीटर पायपीट करावी लागत आहे. गावातील विहीरींनी तळ गाठला आहे तर अनेक ठिकाणी पाण्याअभावी प्राणी-पक्षांचा मृत्यू झाला आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याचे दाैरे करण्यास सांगितले आहे. तसेच दुष्काळ निवारण करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती देखील निवडणूक आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी केली हाेती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दुष्काळी भागाचा दाैरा करीत असून दुष्काळाचा आढावा घेत आहेत. आज पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सर्व 39 नगरसेवकांचा एक महिन्याचा पगार असे आठ लाख रुपये दुष्काळ निवारण्यासाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे. याबाबत दिलीप बराटे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाची परीस्थिती आहे. 72 च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ माेठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मदत करणे आवश्यक आहे. पवार साहेब तसेच सुप्रियाताईंनी दुष्काळ निवारण ही सरकारबराेबरच आपली ही जबाबदारी असून दुष्काळ निवरणासाठी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची सुरुवात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.