Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 20:17 IST2025-03-14T20:16:08+5:302025-03-14T20:17:00+5:30
द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
पुणे: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे.
द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात
प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे. - हेमंत रासने, आमदार, कसबा विधानसभा मतदार संघ
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.