Loni Kalbhor: 'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:26 IST2025-08-10T13:26:18+5:302025-08-10T13:26:42+5:30
कामगाराच्या पत्नीलाही कामावरून काढले, आणि कामगाराला कामावरून काढण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला

Loni Kalbhor: 'माझं काम गेलं, नुकसान झालंय, सगळा पैसा पाण्यात', कामगाराने उचलले टोकाचे पाऊल
लोणी काळभोर : एका ३८ वर्षीय कामगाराने नोकरी गमावणे आणि आर्थिक नुकसान यामुळे मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम ज्ञानेश्वर भाले असे मृताचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तुकाराम यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्यांनी ‘‘माझं काम गेलं आहे, माझं नुकसान झालंय, माझा सगळा पैसा पाण्यात गेला’’ असे म्हटले आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील विजय कसबे (वय ३२), सारिका उर्फ सावित्री सुनील कसबे (वय २७), सुनीता विजय कसबे (वय ४७), करण काळू कसबे (वय २२, सर्व रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे), तसेच अक्षय केवट (वय ३०) आणि अजित सिंग (वय ३०, दोघेही रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
तुकाराम भाले आणि त्यांच्या पत्नी लोणी काळभोर येथील इंडियन ऑइल टर्मिनल कंपनीत काम करत होते. यावेळी आरोपी अक्षय केवट याने तुकाराम यांच्या पत्नीशी अश्लील बोलणे, छेडछाड आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. तुकाराम आणि त्यांच्या पत्नीने याबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. याचा राग आल्याने सुपरवायझर अजित सिंग आणि सुनील कसबे यांनी तुकाराम यांच्या पत्नीला कामावरून काढून टाकले. तसेच तुकाराम यांना देखील कामावरून काढण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला. या सततच्या त्रासाला कंटाळून तुकाराम यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपवले. लोणी काळभोर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे पोलीस निरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.