अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:59+5:302021-08-24T04:15:59+5:30

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून केला. ही घटना वाघोली येथील बीजेएस कॉलेजसमोरील ...

Murder of wife on suspicion of immoral relationship | अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून केला. ही घटना वाघोली येथील बीजेएस कॉलेजसमोरील मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये सोमवारी (दि. २३) पहाटे पाच वाजता घडली.

अनू राजू मिर्झा (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी तिचा पती राजू पुनाराम मिर्झा (वय ३०, रा. कांचन हॉटेल, खांदवेनगर, वाघोली) याला अटक केली आहे. याप्रकरणी राजेश मिर्झा (वय २२, रा. लेबर कॅम्प, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, राजू मिर्झा मूळचा छत्तीसगडचा आहे. तो व त्याची पत्नी अनू मोशी येथे बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुले असून एक अनूबरोबर आणि एक गावाला आहे. राजू हा दारू पिऊन मारहाण करीत असल्याने त्यांच्यात भांडणे होत. दोन-तीन महिन्यांपूर्वी रागाच्या भरात गावाला जाते, असे सांगून अनू घरातून बाहेर पडली. ती वाघोलीत राजूच्या धाकट्या भावाकडे राजेश मिर्झा याच्याकडे आली. गावाला न जाता येथेच राहू लागली. दोनतीन दिवसांपूर्वी राजूला पत्नी गावाला न जाता आपल्या भावाकडे राहात असल्याची माहिती मिळाली. राजेश हा अविवाहित आहे. तेव्हा तो वाघोली येथील लेबर कॅम्पमध्ये आला होता. माझ्याकडे मुलाला दे, मी गावाला जातो, असे त्याने सांगितले होते. पण, तिने मुलाला काही त्याच्याकडे दिले नाही. त्यानंतर सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राजू हा पुन्हा लेबर कॅम्पमध्ये आला. अनू पत्र्याच्या खोलीत झोपली होती. त्याने दरवाजा वाजवून अनू तू बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तिला बाहेर बोलावून घेतले. तू माझ्या भावाशी सारखी बाेलते, असा संशय घेऊन त्याच्यासोबत राहात असल्याचा राग मनात धरुन त्याने अनूच्या पाेटात चाकू खुपसून तिचा खून केला.

Web Title: Murder of wife on suspicion of immoral relationship