उसने दिलेल्या केवळ १०० रुपयांवरून खून; आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:40 IST2025-01-21T12:40:18+5:302025-01-21T12:40:35+5:30
गुन्ह्याच्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी १०० रुपये उसने घेतले होते. परत मागण्यावरून झालेल्या भांडणातून आरोपीने त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून खून केला होता

उसने दिलेल्या केवळ १०० रुपयांवरून खून; आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी
पुणे: हातउसने घेतलेले १०० रुपये सातत्याने परत मागत असल्याच्या वादामुळे ओळखीच्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांना हा निकाल दिला.
भीमराव यशवंत खांडे (वय ५५, रा. वडकी, खोकेनगर, मूळ रा. गिरवी, सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खांडे याने चंद्रकांत शंकर चव्हाण (वय ६८, रा. पांडवनगर, वडकी, हवेली) यांचा १७ एप्रिल २०१५ मध्ये दुपारी बाराच्या सुमारास वडकी गावात असलेल्या एका गोदामाजवळ खून केला होता. याबाबत रमेश चंद्रकांत चव्हाण (वय ४०, रा. पांडवनगर, वडकी) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खांडे आणि चव्हाण हे एकमेकांच्या ओळखीचे होते. खांडे याने चव्हाण यांच्याकडून गुन्ह्याच्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी १०० रुपये उसने घेतले होते. चव्हाण ते पैसे परत मागत होते. त्यामुळे झालेल्या भांडणातून खांडे याने चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केला.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. सध्या पाचगणी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा तपास केला. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार ललिता कानवडे यांनी मदत केली. न्यायालयीन कामकाजात पोलिस हवालदार वैजनाथ शेलार आणि प्रशांत कळसकर यांनी मदत केली.