Pune Crime: पुण्यातील गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून; सीसीटीव्ही, १८ साक्षीदार तपासून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:41 IST2026-03-24T16:40:46+5:302026-03-24T16:41:24+5:30
Pune Crime करिष्मा चौकातून जाताना आरोपींनी अध्यक्षाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून गंभीर जखमी केले होते

Pune Crime: पुण्यातील गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून; सीसीटीव्ही, १८ साक्षीदार तपासून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
पुणे : अनैतिक संबंधामुळे इमारतीतील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या कारणावरून महिलेसमोरच मारहाण केल्याच्या रागातून दशभुजा गणेश मित्र मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेप व 27 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. के. महाजन यांनी हा निकाल दिला. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, दोन डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. संजय अनंत मोहोळ (वय 39, रा. दत्तवाडी) आणि संभाजी सदाशिव कांबळे (वय 27, रा. कोथरूड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
सागर शिंदे (वय 31, रा. कर्वे रोड) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते दशभुजा गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष होते. याप्रकरणी, त्यांचे वडील शिवाजी शिंदे यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांच्या सोसायटीतील महिलेशी आरोपी संजय याचे अनैतिक संबंध असल्याचा रहिवाशांना त्रास होत होता. खुनाच्या घटनेच्या दीड वर्षापूर्वी सागर याने संजय याला समजावत त्या महिलेसमोर लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. तसेच, संभाजी यास संजयची संगत सोडण्याची ताकद दिली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2026 रोजी सागर हा दुचाकीवरून करिष्मा चौकाकडे निघाला होता. यावेळी, आरोपींनी चारचाकीतून येत त्याच्या दुचाकीला धडक दिली. रस्त्यावर पडल्यानंतर सागर आरोपींना पाहून त्याठिकाणाहून पळून जाऊ लागला. आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर रुग्णालयात तो मयत झाला होता. याप्रकरणी, अलंकार पोलिसांच्या वतीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. याप्रकरणात, त्यांनी अठरा साक्षीदार तपासले. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, दोन डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच, सागर याला दवाखान्यात नेत असताना त्यांचे वडील शिवाजी यांकडे मृत्यूपूर्व जबाब देवून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. यावेळी, न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज, पंच, साक्षीदार तसेच तपासी आधिकाऱ्यांचा जबाब याआधारे आरोपीला दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, दंडाच्या रक्कमेतून सागर याच्या वडील व मुलांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.