जीबीएसबाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:05 IST2025-02-01T11:59:15+5:302025-02-01T12:05:03+5:30
जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर या बाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे केली

जीबीएसबाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी
पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी या भागांमध्ये सध्या जीबीएस या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. पालिकेत हा भाग समाविष्ट होऊनही अनेक वर्षे झालेली आहेत, तरीही येथे शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर या बाधित भागांना पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.
खडकवासला सेनेचे विधानसभा प्रमुख नितीन वाघ, किरकटवाडीचे माजी सरपंच गोकुळ करंजावणे, संदीप मते, विजय कोल्हे, मछिंद्र शेलार, तानाजी गाढवे, प्रकाश रिंढे, गणेश लोहकरे, गौरव करंजावणे, प्रवीण दसवडकर, मुकुंद ठाकर यांनी याबाबतचे निवेदन आयुक्ताकडे दिले आहे. या भागांचा पालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे झाली आहेत, तरीदेखील सुधारित व विस्तारित शुद्ध पाणीपुरवठा योजना अजून तयार करण्यात आलेली नाही. या योजनेचा आराखडा करण्यात यावा. कारण या भागातील वितरण नलिका जुन्या झाल्या असून सतत नादुरुस्त होत असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे कायम पाणीटंचाई जाणवत असते. नवीन योजना होईपर्यंत नांदोशी, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला आणि नांदेड़ फाटा परिसरात डीएसके विश्व येथील व्यंकटेश शार्विल या ठिकाणी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या टाकीतून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा.
तसेच खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्रातील गावांचे ड्रेनेजलाईनचे पाणी ओढ्या नाल्यातून धरणात जमा होत आहे. त्याठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प होणे गरजेचे आहे. हा भाग आजही पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियंत्रणात आहे. गावे जरी महापालिकाकडे गेली असली तरी प्राथमिक केंद्रे जिल्हा परिषदेकडे आहेत. या भागाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्र पुरेसे नाही. पालिकेने जीबीएस बाधित रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार चालू केले आहेत. हे हॉस्पिटल लांब असून सोयीचे नाही. तरी लायगुडे हॉस्पिटल अथवा सुभद्राबाई बराटे हॉस्पिटल येथे उपचार करावेत, अशी मागणीही शिवसेनेने केली.