मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता ४ डिसेंबरला सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:29 IST2025-11-25T19:28:05+5:302025-11-25T19:29:47+5:30
- अमेडियाचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांना समक्ष हजर राहण्याचे निर्देश

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता ४ डिसेंबरला सुनावणी
पुणे : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आता ४ डिसेंबर रोजी सहजिल्हा निबंधकांच्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. याबाबत कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. हा व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर निबंधक कार्यालयाने १० दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात कंपनीने कायदेशीर दृष्ट्या बाजू मांडण्यासाठी तब्बल १० वकिलांची फौज तैनात केली आहे.
मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाची चाळीस एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने परस्पर खरेदी केल्यानंतर या जागेच्या गैरव्यवहाराचे राज्यात मोठे पडसाद उमटले होते. या पडसादानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने कंपनीला ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी सात नोव्हेंबर रोजी नोटीस बजाविली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी १६ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत १५ दिवस वाढवून द्यावी, असा अर्ज कंपनीने १४ नोव्हेंबर रोजी नोंदणी आणि मुंद्राक शुल्क विभागाकडे दिला होता. मात्र, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने आठ दिवस मुदतवाढ देऊन २४ नोव्हेंबरपर्यंत ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस जारी केली होती.
ही बुडविलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी या विभागाने अमेडिया या कंपनीस आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने पंधरा दिवसांची मुदत वाढवून द्यावी, असा अर्ज मुद्रांक शुल्क विभागाचे सह जिल्हा निबंधक यांच्याकडे केला होता. त्यानुसार आता निबंधक कार्यालयाने १० दिवसांची मुदत दिली असून येत्या ४ डिसेंबर रोजी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. यासाठी कंपनीचे भागधारक व खरेदी करणारे दिग्विजयसिंह पाटील यांना समक्ष निबंधक कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. या व्यवहारात खरेदीदार पाटील हेच असल्याने त्यांनाच सुनावणीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीने याबाबत बाजू मांडण्यासाठी तब्बल दहा वकिलांची फौज तैनात केली आहे. त्यामुळे या सुनावणीसाठी पाटील हजर राहणार की त्यांचे वकील बाजू मांडतील याबाबत उत्सुकता आहे.