पुणे : मार्च २०२० मध्ये पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर, काही आठवड्यांतच पुणे हे देशातील ‘हॉटस्पॉट’ बनले होते. आताही राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या ७ हजार सक्रिय रुग्ण आहेत.
‘पॉझिटिव्हीटी रेट’ ही १० फेब्रुवारीनंतर ७ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर गेला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. फेब्रुवारीच्या ९ ते १५ या आठवड्यातच ४ हजार रुग्णांची वाढ झाली आहे.
रुग्णसंख्या सातत्याने वाढत राहिल्यास पुन्हा ‘कंटेन्टमेंट झोन’ तयार करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याचा विचार करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात ३० जानेवारीला एल्गार परिषद झाली. त्यानंतर ‘पानिपतनंतरचा मराठ्यांचा २५० वा दिल्ली विजय दिन’ १४ फेब्रुवारीला साजरा झाला. १५ फेब्रुवारीचा गणेशजन्म पुण्यात अनेक ठिकाणी जोरात साजरा झाला. याशिवाय खासगी लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रमांची रेलचेलही वाढू लागली आहे.
या सर्वच ठिकाणी मास्कचा वापर, शारीरिक अंतर, व्यक्तिगत-सार्वजनिक निर्जंतुुुंकीकरण या मुद्यांचा फज्जा उडाला आहे. कोरोनामुळे बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली. मात्र, येथील उपस्थिती अजूनही ३० टक्क्यांच्यापुढे गेलेली नाही.