नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत गहाळ ३ लाख ९० हजारांचे मोबाइल नागरिकांना केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 18:51 IST2026-01-11T18:47:54+5:302026-01-11T18:51:09+5:30
३ लाख ९० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण १२ मोबाइल फोन हस्तगत केले असून, ते संबंधित मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत

नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत गहाळ ३ लाख ९० हजारांचे मोबाइल नागरिकांना केले परत
नारायणगाव : नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हरविलेले मोबाइल फोनचा तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण १२ मोबाइल फोन हस्तगत केले असून, ते संबंधित मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली .
पोलिस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांना गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेणे कामी योग्य त्या सूचना, मार्गदर्शन केले. त्यानुसार नारायणगाव पोलिस स्टेशनचे डीबी पथकातील पोलिस हवालदार मंगेश लोखंडे, पोलिस शिपाई सोमनाथ डोके, सत्यम केळकर, दत्ता ढेंबरे, गोविंद केंद्रे, टिलेश जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेऊन पुणे, चाकण, मध्य प्रदेश तसेच केरळ अशा विविध ठिकाणी संपर्क करून ३,९०,००० रुपये किमतीचे एकूण १२ मोबाइल यांचा शोध घेऊन हस्तगत केले आहेत.
यापूर्वीदेखील ६,०६,००० रुपये किमतीचे २६ मोबाइल यांचा शोध घेऊन हस्तगत केले असून, एकूण ९,९६,००० /- रुपये किमतीचे ३८ मोबाइल आजपर्यंत हस्तगत करून नागरिकांना परत करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली .