मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 20:22 IST2025-11-26T20:22:11+5:302025-11-26T20:22:34+5:30
परप्रांतियांसंदर्भात असलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही नेत्यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल
पुणे: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महाविकास आघाडीतील समावेशावरून आघाडीमध्ये मतभेद आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी मनसेच्या समावेशाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कॉंग्रेस नेत्यांना मनसे आंदोलनात चालते, मनसे रस्त्यावर उतरायला चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही, असा सवाल केला आहे.
मनसे पक्षाने लोकसभा निवडणूकीत भाजप व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली. मात्र, या निवडणूकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तेव्हापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईव्हीएम मशिनमुळे आपल्या पक्षाचा पराभव झाल्याची भूमिका जाहीरपणे मांडत आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र व इतर राज्यांच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतचोरी झाली, याचे प्रात्यक्षिक करून सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. राहुल गांधी यांच्या या भूमीकेला पाठिंबा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होत आक्रमक भाषण केल. यानंतर मनसे पक्षाच्या महाविकास आघाडीतील समावेशाची चर्चा सुरू झाली. मात्र, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांसंदर्भात असलेल्या भूमिकेमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही नेत्यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. याबाबत अद्याप कसलाच निर्णय झालेला नाही.
दरम्यान, शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कॉंग्रेस नेत्यांना सवाल केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मत चोरीचा नारा राहुल गांधी यांनी दिला. त्या भूमीकेला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत काढलेल्या मोर्चात मनसे पक्ष सहभागी झाला. रस्त्यावर उतरला, मनसे आंदोलनात चालतो, मग महाविकास आघाडीत कसा चालत नाही, असा सवाल उपस्थित केला. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही केवळ मनसेच नाही तर रिपाइं, वंचित व इतर पक्षांनाही बरोबर घेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत दुसरीकडे जाणार नाहीत असे नाही
महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये निवडणुकीत लढाई सुरू आहे. भाजपने स्वार्थासाठी पक्ष फोडले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. काही वर्षांपूर्वी शिवसेनेतील एक गट एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेला. तर, बच्चू कडू, उदय सामंत या सारखे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नंतर तिकडे गेले. जाण्यापूर्वी सामंत शिवसेना कार्यालयात येवून नास्ता करून गेले. आता सामंत आमच्याकडे जरी आले नाहीत. तरी पण ते दुसरीकडे कुठे जाणार नाहीत, असे होणार नाही, असेही अहिर म्हणाले.