सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने जुन्नर सुन्न; खेळताना शेततळ्यात बुडून १० आणि ७ वर्षांच्या मुलांचा अंत, गावात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:46 IST2025-11-24T18:41:16+5:302025-11-24T18:46:44+5:30
Pune Accident: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या १० वर्षांचा मुलगा ...

सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने जुन्नर सुन्न; खेळताना शेततळ्यात बुडून १० आणि ७ वर्षांच्या मुलांचा अंत, गावात हळहळ
Pune Accident: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या १० वर्षांचा मुलगा आणि त्याच्या सात वर्षांच्या बहिणीचे मृतदेह त्यांच्या घराशेजारील एका कृत्रिम शेततळ्यात काही तासांनंतर आढळून आले. प्राथमिक तपासात खेळताना पाण्यात पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खडकवास्तीच्या इस्लामपुरा भागात राहणारे अफान अफसार इनामदार (वय १०) आणि त्याची बहीण रिफार अफसार इनामदार (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत.
बेपत्ता झाल्यावर बिबट्याच्या हल्ल्याची भीती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफान आणि रिफार हे शनिवारी दुपारी त्यांच्या घराजवळील इदगाह मैदानात इतर मुलांसोबत खेळायला गेले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास त्यांची आई कामावरून घरी परतली असता मुले घरी नसल्याचे तिच्या लक्षात आले. मुले परत न आल्याने आईने तातडीने शोध सुरू केला. अर्ध्या तासानंतर तिने गावातील इतरांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली.
मुले बेपत्ता झाल्याचे कळताच जुन्नरचा भाग बिबट्याच्या हल्ल्यासाठी संवेदनशील असल्याने सुरुवातीला पोलिसांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती वाटली. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी आणि वन्यजीव बचाव तज्ञांना पाचारण करण्यात आले. जवळचे शेत आणि झाडांनी वेढलेल्या परिसराचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. सुमारे ३०० ग्रामस्थांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला.
खेळताना शेततळ्यात बुडून मृत्यू
रात्री उशिरा झालेल्या सामुदायिक शोधमोहिमेदरम्यान, मुलांच्या चपला परिसरातील एका कृत्रिम शेततळ्याजवळ आढळून आल्या. त्यानंतर थोड्याच वेळात दोन्ही भावंडांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक निरीक्षणातून हा अपघाती बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार असल्याचे दिसत आहे. खेळत असताना नकळतपणे पाण्यात उतरल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, मुले बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे वडील अफसार इनामदार (जे सहा महिन्यांपूर्वी दुबईला गेले होते) ते रविवारी गावात परतले आहेत. मुले आई आणि आजीसोबत राहत होती. या घटनेमुळे इनामदार कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.