शिरुरच्या बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना; बैलाचे शिंग पोटात घुसून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 22:25 IST2023-04-13T21:48:02+5:302023-04-13T22:25:07+5:30
तरुणाच्या मृत्यूची वार्ता शिरूर तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली

शिरुरच्या बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना; बैलाचे शिंग पोटात घुसून तरुणाचा मृत्यू
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान युवकाच्या पोटात बैलाची शिंग असल्याने दुर्दैवी घटना घडली आहे.
राऊतवाडी येथील वृषाल बाळासाहेब राऊत (वय 35) हे बैलगाडा घेऊन उमेश राऊत, ऋषिकेश राऊत, दिनेश राऊत, आकाश राऊत यांच्यासह बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे गेले होते. बैलगाडा शर्यतीसाठी बैल गाडीतून खाली उतरवत असताना बैलाने वृषालला शिंगावर घेतल्याने बैलाची शिंगे पोटात घुसली. जखम खोलवर गेल्याने वृषालला शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत योगेश तरुण राऊत (वय ३६) राहणार राऊतवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. यांनी सदर बाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी खबर दिली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मित मोतीची नोंद करण्यात आली. त्याच्या मृत्यूची वार्ता संपूर्ण शिरूर तालुक्यात पसरताचा सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने राऊतवाडी गावावर शोककळा पसरली आहे.