मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:04 IST2025-09-02T12:04:18+5:302025-09-02T12:04:32+5:30
जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तर जवळपास प्रचंड ट्राफिक, नाकाबंदी, अचानक तपासणी, ओळख पटवून देण्याची जबरदस्ती यामुळे पुणेकर त्रासले

मंत्र्यांचे दौरे; स्थानिक नेत्यांचा हट्ट, पुणेकरांच्या भावना पुण्यातीलच नेत्यांना कळणार की नाही?
पुणे : एका पुलाचे लोकार्पण, त्यासाठी चार रस्ते तासभर बंद. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात दुसऱ्या पुलाचे लोकार्पण, त्यासाठी अडीच तास वाहतुकीचा खोळंबा. त्याशिवाय केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दौरे. या दौऱ्यांमागे पुण्यातीलच स्थानिक नेत्यांचा हट्ट असतो हे आता उघड झाले आहे. त्यातूनच पुणेकरांच्या भावना पुण्यातील नेत्यांना कळणार की नाही, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील तीनपदरी उड्डाणपुलाच्या केवळ एकाच मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री दोनच आठवड्यांपूर्वी पुण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी लगेचच पुन्हा मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते दुसऱ्या पुलाच्या एकाच मार्गिकेचे लोकापर्ण झाले. व्हीआयपींच्या या दौऱ्यात प्रशासकीय मनुष्यबळ तर वाया जातच आहे, शिवाय त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था असल्याने ते जाणार असलेल्या रस्त्यांवरील किंवा त्यांचा कार्यक्रम जिथे आहे तिथल्या सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवावी लागतात. सोमवारीही मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने गोयल गंगा येथील खाऊ गल्ली व तेथील खाद्यपदार्थांची सर्व दुकाने बंद होती.
मागील काही दिवसात स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही विकासकामाचे लोकार्पण करण्यासाठी राज्य किंवा केंद्रीय स्तरावरील नेत्यांचाच आग्रह धरला जात आहे. त्यासाठी काम पूर्ण झालेले असले तरीही त्याचा वापर थांबवण्यात येतो. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका बाजूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हवे, असा आग्रह धरण्यात आला होता. त्यांची वेळ मिळेपर्यंत १५ दिवस वापर बंद ठेवण्यात आला. विद्यापीठ चौकातील पुलाचे काम अपुरे असतानाही एकाच मार्गिकेचे लोकापर्ण झाले. कामे अपूर्ण किंवा पूर्ण, लोकार्पण करण्यासाठी मोठ्ठाच माणूस हवा या आग्रहापोटी पुणेकर वेठीस धरले जात आहे. याकडे पुण्यातीलच नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.
दररोजच्या वाहतूक कोंडीने, खड्डे भरल्या रस्त्यांनी, सिग्नल तोडले जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसांमुळे पुणेकर आधीच त्रासले आहेत. शहरातील एकही रस्ता कोणताही अडथळा न येता प्रवास करता येईल असा राहिलेला नाही. त्यात या नेत्यांच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांनी भर पडली आहे. या बड्या नेत्यांचा ताफा जात नाही तोपर्यंत संपूर्ण रस्त्यावरची वाहतूक थांबवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तर जवळपास नाकाबंदीच केली जाते. त्याशिवाय वाहनांची अचानक तपासणी, कार्यक्रमाला जाणाऱ्यांची तपासणी, ओळख पटवून देण्याची जबरदस्ती असे त्रासदायक असणारे वेगवेगळे या नेत्यांच्या दौऱ्यामुळे घडतात ते वेगळेच. हा त्रास स्थानिक नेत्यांनीच आता पुढाकार घेऊन थांबवावा, नेत्यांना वारंवार शहरात बोलावणे बंद करावे असे मत दुचाकी व चारचाकी वाहनाने दररोज प्रवास करावाच लागणाऱ्या असंख्य पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.