Pune Metro: मेट्रोची इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा सुरू; पहिल्या टप्प्यात 'या' १० स्थानकांवर ई-बाइक सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 20:35 IST2025-02-11T20:35:43+5:302025-02-11T20:35:59+5:30
ई-बाइक फीडर सेवेसाठी संबंधित मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग स्टेशन्स (प्लग-इन आणि स्वॅपिंग) उपलब्ध करण्यात येणार

Pune Metro: मेट्रोची इंटिग्रेटेड ई-बाइक फीडर सेवा सुरू; पहिल्या टप्प्यात 'या' १० स्थानकांवर ई-बाइक सेवा
पुणे : पुणेमेट्रोच्याप्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या दैनंदिन १ लाख ६० हजारपेक्षा जास्त प्रवासीमेट्रोतून प्रवास करत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या (फस्ट व लास्ट माईल) कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या पीसीएमसी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंदनगर, वनाझ या १० स्थानकांवर ई-बाइक फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे.
'स्विच ई-राइड' या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाइकमार्फत ही सेवा दिली जाणार आहे. ही सेवा घेण्यासाठी नागरिकांना मोबाइल ॲप्स डाउनलोड करावे लागेल. केवायसी पूर्ण करून या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागेल. सुरक्षित, अखंड, लाइव्ह ट्रॅकिंग आणि सहाय्यतेसाठी ग्राहक सेवा, जिओ-फेन्सिंग सक्षम करण्यात येणार आहे. भविष्यात पुणे मेट्रो मोबाइल ॲप्समध्ये एकत्रित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही सेवा उपलब्ध असणार आहे. ई-बाइक फीडर सेवेसाठी संबंधित मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग स्टेशन्स (प्लग-इन आणि स्वॅपिंग) उपलब्ध करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या काळात ही योजना मेट्रो स्टेशन्स आणि जिथे सुरक्षित 'डॉकिंग स्टेशन्स' उभारण्याची जागा उपलब्ध असेल अशा शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट्स/आयटी पार्क्स आणि मोठ्या सोसायट्या आणि सरकारी कार्यालये यांच्या दरम्यान चालवण्याची आहे.
ई-बाइकची वैशिष्ट्ये
- गती - जास्तीत जास्त २५ किमी
- क्षमता - दोन व्यक्ती
- एकदा चार्ज केल्यावर जास्तीत जास्त ८० किमी.
- मदतीसाठी मोबाइल ॲपवर 'एसओएस' बटण उपलब्ध आहे.
- कीलेस स्टार्टिंग – मोबाइल ॲप्सवर सुरू आणि बंद करण्याची सोय.
- लाइव्ह ट्रॅकिंग आणि जिओ-फेन्सिंग.
असे आकारले जातील भाडे...
वेळ रक्कम
-एक तास - ५५ रुपये
-दोन तास - ११०
-तीन तास - १६५
-४ तास - २००
-६ तास - ३०५
-२४ तासांसाठी - ४५०