‘पॅट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क यूट्युबवर; उत्तरे फोडल्याचा दावा; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:24 IST2025-10-12T11:24:14+5:302025-10-12T11:24:45+5:30
तसेच संबंधित युट्युब चॅनेल्स सायबर विभागाच्या मदतीने बंद करण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली. ११ ऑक्टोबर रोजी गणिताचा पेपर झाला.

‘पॅट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क यूट्युबवर; उत्तरे फोडल्याचा दावा; पुणे पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई : पॅट अर्थात पिरियोडिकल असेसमेंट टेस्ट परीक्षेतील गणिताचा पेपर आदल्या दिवशीच फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आदल्या दिवशीच एका युट्युब वृत्तवाहिनीवर प्रश्नांची उत्तरे फोडण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच संबंधित युट्युब चॅनेल्स सायबर विभागाच्या मदतीने बंद करण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली. ११ ऑक्टोबर रोजी गणिताचा पेपर झाला. परीक्षेच्या पहिल्या दिवशीच काही ठिकाणी प्रश्नपत्रिकांची कमतरता भासली. तर काही ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरेशा मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
गणिताच्या पेपरच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे उत्तरे देणारे युट्युब वृत्तवाहिनीवर व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे आता गणिताचा पेपर फुटला कसा, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात विचारले जात आहे. राज्यभरात ६०,००० पेक्षा अधिक शाळांमध्ये पॅट परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा१३ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
१५ ते २० टक्के प्रश्नपत्रिका कमी
दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिक्षकांनी जे काही शिकवलले आहे, ते त्यांना किती समजले. विद्यार्थ्यांची पातळी कुठपर्यंत आहे. प्रत्येक विषयामध्ये त्यांना कुठे अडचण येत आहे. इत्यादी बाबी पॅट परीक्षेच्या माध्यमातून शिक्षण विभाग समजून घेणार आहे. त्यानुसार पुढील उपाययोजना करण्यात येतील. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्येपेक्षा १५ ते २० टक्के प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सांगितले.
यू-डायस आकडेवारीनुसार प्रश्नपत्रिकांचा पुरवठा -
पाच टक्के प्रश्नपत्रिका अतिरिक्त पाठवण्यात आल्या होत्या. परंतु, यु-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार प्रश्नपत्रिकांचा पुरवठा करण्यात आला. मात्र, अनेक ठिकाणी या प्रणालींतर्गत विद्यार्थ्यांची शाळांकडून नोंदणी नसल्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्याचा दावा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केला.
गणिताचा पेपर फुटल्याचे आता सर्वत्र माहिती झाले आहे. खरेतर एससीईआरटीने पूर्ण क्षमतेने प्रश्नपत्रिका द्यायला हव्यात, पण तसे होत नाही. तसेच या परीक्षांचा निकाल देखील जाहीर होत नाही.
पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचे मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी माने यांनी लोकमतला सांगितले.