गेल्या १४ वर्षांत मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अडथळे; पुण्याला पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 11:02 IST2025-09-03T11:02:05+5:302025-09-03T11:02:44+5:30
केवळ ६९ हजार १११ क्यूसेक पाण्यानेच ५४२ मीटरची पूरपातळी गाठली होती

गेल्या १४ वर्षांत मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अडथळे; पुण्याला पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढला?
पुणे : टेरीच्या अभ्यासानुसार पुण्यात पावसाचे प्रमाण ३७ टक्क्यांनी वाढणार असल्याने भविष्यात नदीकाठच्या भागात पुराचा धोका आणखी वाढणार आहे. गेल्या १४ वर्षांत मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याला अडथळे निर्माण झाल्याने शहराला पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढला असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाकडून मुळा-मुठा नद्यांच्या संगमानंतर बंडगार्डन येथे १ लाख १८ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर पूरपातळी गाठली जाणे अपेक्षित आहे. मात्र, २५ जुलै २०२४ च्या पुराच्या वेळी केवळ ६९ हजार १११ क्यूसेक पाण्यानेच ५४२ मीटरची पूरपातळी गाठली होती. तसेच यावर्षी २० ऑगस्ट रोजी सोडण्यात आलेल्या ७१ हजार ४०८ क्यूसेक पाण्यानेही हीच पूरपातळी गाठली आहे, असे यादवाडकर यांनी सांगितले.
आकडेवारीत तफावत
मुळा-मुठा नद्यांच्या संगमानंतर बंडगार्डन येथे २० ऑगस्ट रोजी ७१ हजार ४०८ क्यूसेक पाणी होते. पण मुळा आणि मुठा या नदीमध्ये २० ऑगस्ट रोजी सोडण्यात पाण्याच्या विसर्गाची आकडेवारी ही ७१ हजार ४०८ क्यूसेक पाण्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या आकडेवारी तफावत असल्याची माहिती समोर आली आहे.