Gudhi Padwa 2026: मराठी नववर्षास गुढीपाडव्यापासून सुरुवात; सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभी करावी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:43 IST2026-03-18T13:42:26+5:302026-03-18T13:43:19+5:30
गुढी उभारण्यासाठी मुहूर्त नसला, तरी सकाळी लवकर गुढी उभारणे इष्ट ठरेल असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले आहे

Gudhi Padwa 2026: मराठी नववर्षास गुढीपाडव्यापासून सुरुवात; सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभी करावी!
पुणे: मराठी नववर्षास गुरुवारी (दि.१९) गुढीपाडव्यापासून सुरुवात हाेत असून, घरोघरी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभी करावी, असे आवाहन ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी केले आहे. गुढी उभारण्यासाठी मुहूर्त नसला, तरी सकाळी लवकर गुढी उभारणे इष्ट ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
नवीन शके १९४८ या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढी उभारून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ती ग्रहांवर आधारित कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते. म्हणून, संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करावी, असे मोहन दाते यांनी सांगितले.
अशी उभारावी गुढी
- गुढीपूजनाकरिता वेगळा असा विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे, याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल ते सर्व करता येते.
- गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत, ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.
- गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी.
- जिथे गुढी उभी करावयाची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी. हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.
- ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते.
- ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी. ‘ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु सर्वाभिष्ट फलप्रद । प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।।’
ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे.
- त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे.
- सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.
- गुरुवार १९ मार्च रोजी गुढीपाडव्यापासून शके १९४८ या नवीन वर्षाची सुरुवात अमावास्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर होत आहे.
- या वर्षी १७ मे ते १५ जून या कालावधीत ज्येष्ठ अधिकमास येत आहे.
- यंदा ५ मे आणि २९ सप्टेंबर असे दोन अंगारक चतुर्थी योग येत आहेत. तसेच, पाच गुरुपुष्यामृत योग अनुक्रमे २३ एप्रिल, २१ मे, १८ जून, १८ फेब्रुवारी (२०२६) आणि १८ मार्च या दिवशी आहेत.