Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 21:08 IST2018-07-31T19:08:01+5:302018-07-31T21:08:34+5:30
Maratha Reservation: चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

Maratha Reservation: 'चाकणमधील जाळपोळीच्या घटनेत परराज्यातील लोकांचा समावेश'
पुणे - चाकण येथील हिंसाचारात बाहेरील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. मात्र, केवळ आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसे लेखी आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. तसेच 2 तारखेपासून पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, बाळासाहेब अमराळे आदी उपस्तिथ होते. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, तसेच आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करावे, कुठल्याही चुकीच्या प्रवृत्तींना आंदोलनात सहभागी होऊ देऊ नये, असे आवाहन यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले. राजेंद्र कोंढरे म्हणाले, चाकण येथील हिंसाचारात परराज्यातील लोक सामील होते. हिंसाचार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी. पण, केवळ आंदोलनात सामील झालेल्या तरुणांवर दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत. तसा आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात यावा. असा लेखी आदेश अद्याप पोलिसांकडे न आल्याने समाजात वेगळा संदेश जात आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये. 1 ते 9 ऑगस्ट या काळात मराठा संघटनेचे कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. पुण्यात 2 तारखेला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल. मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन हे लोकशाही मार्गानेच करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
मराठा मोर्चावेळी जाळपोळ करणारे, बरेच तरुण बाहेरुन आले होते. आतापर्यंत आम्ही 22 आरोपींची ओळख पटवली असून त्यांना कुठल्याही क्षण अटक होऊ शकते. या 22 जणांना न्यायालयाकडून जामीन मिळू नये, तसेच त्यांना अधिकाधिक कडक शिक्षा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे तेथील पोलीस अधिकारी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.