हंडाभर पाण्यासाठी अनेक आदिवासींचा जीव धोक्यात; जुन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:46 IST2025-04-26T18:45:08+5:302025-04-26T18:46:13+5:30

अति दुर्गम भागातील जीवनदायिनी असलेल्या मांडवी नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा उद्विग्न प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत

Many tribals lives are at risk for a pot of water Severe water shortage in Junnar taluka | हंडाभर पाण्यासाठी अनेक आदिवासींचा जीव धोक्यात; जुन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

हंडाभर पाण्यासाठी अनेक आदिवासींचा जीव धोक्यात; जुन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

ओतूर : जुन्नर तालुक्यातील पूर्व, पश्चिम, उत्तरेकडील बहुतांशी आदिवासी भागात एप्रिलमध्येच पिण्याच्या पाण्याची तीव्रता वाढली असून, अगदी हंडाभर पाणी मिळविण्यासाठी खोल दरीत शिवकालीन टाक्यात व विहिरीत उतरून आदिवासी महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आपला जीव धोक्यात घालताना दिसून येत आहेत. दरवर्षीप्रमाणे कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे व मांडवी नदीच्या खोऱ्यातील वाड्यावस्त्या, झापावरील गेली ७० वर्षांपासून रखडलेला आणि फक्त उन्हाळ्यात राजकीय नेत्यांना आठवणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यंदादेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढल्याने प्रामुख्याने जुन्नरच्या पूर्व-पश्चिम भागात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे.

स्थळ पाहणीकरून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे मांडवे, कोटमवाडी, सुकळवेढे या तीन ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. सहा टँकर मागणी प्रस्ताव मंजूर असून, त्या भागांत टँकरने पाणीपुरवठा एकाच टँकरने सुरू आहे, तोही मनाप्रमाणे पाणीपुरवठा करताना दिसत आहे. बाकीचे टँकर पाणीपुरवठा फक्त कागदोपत्री दिसत आहे. आदिवासी भागातील हडसर ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता कारभळ, पूर्व भागातील नळावणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांची भेट घेऊन टँकर सुरू करण्याची मागणी केली. याबाबत सरपंच कारभळ म्हणाल्या, "जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मागील अडीच वर्षांपूर्वी सुरू केले आहे. हे काम अद्याप अपूर्ण आहे. हडसर येथील तलाव कोरडा पडला आहे. तलावातील गाळ काढणे आवश्यक आहे. गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधला आहे. या भागातील हडसर, पेठेची वाडी येथे पाण्याची तीव्र टंचाई असल्याने तातडीने टँकर सुरू करणे आवश्यक आहे. पाण्यावाचून जनावरांचे व ग्रामस्थांचे हाल होत आहेत." सरपंच उबाळे म्हणाल्या, "शिंदेवाडी, पेमदरा, आणे भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागात टँकर सुरू करण्यासाठी गटविकास अधिकारी भोईर यांना प्रस्ताव दिला आहे.

नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार 

कोपरे, मांडवे व जांभूळशीसह वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू झाले. मात्र, टँकर चालक ओळखीच्या ठिकाणी पाण्याची लूट करताना दिसून येत आहेत. गावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘हर घर जल, हर घर नल’ योजनेंतर्गत पाण्यासाठी पाइपलाइन टाकलेल्या आहेत; परंतु आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी काहीशी गत जुन्नर तालुक्यातील अतिदुर्ग आदिवासी भागातील गावांची झाली आहे. अति दुर्गम भागातील जीवनदायिनी असलेल्या मांडवी नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा उद्विग्न प्रश्न आदिवासी बांधव विचारत आहेत. प्रशासनाकडून पाण्याच्या योजना राबविण्याचा कागदोपत्री केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

जुन्नर तालुक्यातील तेरा गाव व वाड्या वस्तीतील एकूण ७१६१ लोकसंख्येला टँकरने पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये मांडवे ८३५, कोपरे १०६५, सुकाळवेढे ४९६, आंबे ६२०, निमगिरी १५४०, कोटमवाडी ३५०, बांगरवाडी १४१०, हडसर ११८८, गोद्रे १०५५, शिंदेवाडी २१३०, आणे ३५००, खटकाळे खैरे २५० व देवळे ७५० या १३ गावातील वाड्या वस्त्यातील नागरिकांना पाण्याचे टँकर तातडीने सुरू करण्यात आले आहेत. या भागामध्ये टँकरची संख्या वाढली पाहिजे, अशी नागरिकांकडून सातत्याने ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येत आहे. आम्ही त्यावर टँकर संख्या वाढ करून देत आहोत; पण लोकसंख्येनुसार हंड्याऐवजी बॅरलने पाणी नागरिकांनी घ्यावे. - विठ्ठल भोईर, गटविकास अधिकारी, जुन्नर

Web Title: Many tribals lives are at risk for a pot of water Severe water shortage in Junnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.