बारामतीत मनोहर मामा भोसलेसह तिघा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:14 IST2021-09-10T04:14:10+5:302021-09-10T04:14:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ...

Manohar Mama Bhosale and three others were booked in Baramati | बारामतीत मनोहर मामा भोसलेसह तिघा जणांवर गुन्हा दाखल

बारामतीत मनोहर मामा भोसलेसह तिघा जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव ,ता. करमाळा, जि. सोलापूर) सह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत खरात (रा. साठेनगर, कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार खरात यांच्या वडिलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजुबावी (ता. बारामती) मठामध्ये गेले. त्यांनी बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडिलांचा गळ्यावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपये त्यांचे व त्यांचे वडिलांच्या जिवाचे बरे-वाईट होईल अशी भीती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत खरात यांच्या तकारीवरून आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओंकार शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (अक्षेपार्ह जाहिरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले व त्याचे साथीदारांनी कोणाची फसवणूक वा भीती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल, त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.

Web Title: Manohar Mama Bhosale and three others were booked in Baramati