नवले पुलाजवळील 'हा' रस्ता कायमस्वरूपी बंद; अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 14:36 IST2025-11-28T14:35:34+5:302025-11-28T14:36:16+5:30
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुलावर अपघातांची एक मालिकाच सुरू झाली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप होता

नवले पुलाजवळील 'हा' रस्ता कायमस्वरूपी बंद; अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीची कारवाई
धायरी : नवले पूल परिसरातील वाढत्या आणि गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून सेल्फी पॉइंट, नऱ्हे येथील मानाजीनगरकडे जाणारा रस्ता आज गुरुवारपासून अधिकृतपणे कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने विशेषतः नऱ्हे येथे येणाऱ्या वाहनचालकांना स्वामिनारायण मंदिराशेजारील सर्व्हिस रस्त्याचा वापर करणे बंधनकारक झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुलावर अपघातांची एक मालिकाच सुरू झाली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप होता. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावर उतरून तिरडी आंदोलन आणि दशक्रिया आंदोलन यांसारखी तीव्र आंदोलने करून परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.
या सलग आंदोलनाची अखेर दखल घेण्यात आली आहे. प्रखर पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्गाने तातडीची कारवाई करत, अपघातप्रवण क्षेत्रावर बदल करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाकडून मानाजीनगर (नऱ्हे) दिशेने जाणारा मार्ग कायमस्वरूपी बंद केला. या तत्काळ उपायासोबतच भविष्यातील कायमस्वरूपी उपायांवरही भर दिला पाहिजे. स्वामिनारायण मंदिर ते वारजे पूल या संपूर्ण रस्त्याचे नवीन रेखांकन करून एलिव्हेटेड पूल दर्जेदार आणि सुरक्षित बांधणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
सर्व्हिस रस्त्यावर वाढणार ताण; नागरिकांना संयमाचे आवाहन...
हा महत्त्वाचा बदल झाल्यामुळे, पुढील काही दिवस स्वामिनारायण मंदिराशेजारील सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन येथील नागरिक मोरे यांनी केले आहे. बंद करण्यात आलेल्या या रस्त्यावरून वळण घेत असताना अनेकदा गंभीर अपघाताची शक्यता निर्माण होत होती. अनेक वाहनचालक येथे जीव धोक्यात घालून वाहने वळवत असत. रस्ता बंद झाल्यामुळे, किमान आता तरी अपघाताची भीती कमी होईल आणि सर्व्हिस रस्ता मोकळा राहील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.