माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक :गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात सरसावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 13:53 IST2025-06-01T13:51:30+5:302025-06-01T13:53:57+5:30
- शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली बळीराजा सहकार पॅनल उभारण्याची केली घोषणा

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक :गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवार गट अजित पवारांच्या विरोधात सरसावला
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २३ मे रोजी बारामतीत झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात गुरुशिष्य ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्या विरोधात पॅनल उभारण्याची घोषणा केली. त्याचवेळी मालेगाव कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळून दुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले. मात्र, आता शरद पवार गटानेदेखील माळेगावच्या रणसंग्रामात उडी घेत पॅनलची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या 'माळेगाव' मध्ये चुरशीच्या लढतीचे स्पष्ट संकेत आहेत.
शरद पवार गटाची शुक्रवारी (दि. ३०) बारामतीत बैठक झाली. यावेळी सर्वांनी एकत्र येत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार पॅनलच्या लढतीची घोषणा केली. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात गुरुशिष्यांनी सहकार बचाव शेतकरी पॅनलची घोषणा केली आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांनी २७ मे रोजी स्वतःचाच 'ब' वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तो अर्ज कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्री पवार यांच्या धक्कातंत्राची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत 'सस्पेन्स' कायम ठेवला आहे. १३ जून रोजी ते त्यांच्या गटाचा चेअरमन पदाचा चेहरा पुढे आणणार आहेत.
शरद पवार गटाने 'छत्रपती'ला पूर्वीचे दिवस आणायचे असल्याने सुरुवातीला पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिला. मात्र, सर्वपक्षीय पॅनलमध्ये स्थान मिळाले नसल्याचा आरोप करीत 'छत्रपती'च्या
निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शरद पवार गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती. मात्र, शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीत सर्वांनी थेट बळीराजा सहकार बचाव पॅनलची घोषणा केली. तसेच शनिवारी (दि. ३१) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गोविंदबाग निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माळेगाव कारखान्याबाबत भेट घेत चर्चा केली. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात आता गुरुशिष्यांपाठोपाठ शरद पवारदेखील आमनेसामने येणार आहेत.
मला माहिती नाही
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार गट माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उतरला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पवार विरुद्ध पवार लढतीचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे शनिवारी (दि. ३१) बारामती दौऱ्यावर होते. पत्रकारांनी ज्येष्ठ नेते पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी 'मला माहिती नाही' अशा तीन शब्दांत तो विषय संपवला.
'सस्पेन्स' कायम
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांनी २७मेला स्वतःचाच 'ब' वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत 'सस्पेन्स' कायम ठेवला आहे. १३ जून रोजी ते त्यांच्या गटाचा चेअरमन पदाचा चेहरा पुढे
आणणार आहेत.