दौंड : तालुक्यातील सोनवडी, पांढरेवाडी व गार परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक धाडी टाकून बनावट दारू बनवणारी ‘फिरती फॅक्टरी’ आणि कारखाने उद्ध्वस्त करत सुमारे ८५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार वाहने, दारू निर्मितीची यंत्रसामग्री, स्पिरीट व मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती दौंड विभागाचे निरीक्षक विजय रोकडे व दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरूक यांनी दिली.
या प्रकरणी सुनील नगराळे (रा. धुळे), सोमनाथ नांदखिले (रा. गार, ता. दौंड) व विजय झगडे (रा. पांढरेवाडी, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात दौंड तालुक्यात ही धडक कारवाई करण्यात आली. सोनवडी परिसरात आयशर टेम्पो (क्र. एमएच ०३ सीपी ९०९०) मध्ये सुरू असलेली बनावट दारूची ‘फिरती फॅक्टरी’ उद्ध्वस्त करण्यात आली. या ठिकाणी दारू निर्मितीसाठी लागणारे स्पिरीट, एक स्वयंचलित बॉटलिंग मशीन, देशी दारूच्या ९६ बाटल्या व विनालेबल ११० बाटल्या व्हॅनसह जप्त करण्यात आल्या. पांढरेवाडी येथे छापा टाकून ट्रॅक्टर व ह्युंदाई कारमधून होणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस आणण्यात आली असून, देशी दारूच्या बाटल्या व वाहने जप्त करण्यात आली. तसेच गार परिसरात एका शेतातील वीटभट्टीजवळ लपवून ठेवलेला बनावट दारूचा मोठा साठाही जप्त करण्यात आला.
ही संयुक्त कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग, दौंडचे निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक मयूर गाडे तसेच मुंबई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस.आर. गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, संकेत वाजे, सौरभ देवकर, सोपान टोंपे, दत्तात्रय साळुंके व केशव वामने सहभागी होते. पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Authorities seized ₹85.42 lakh worth of illicit liquor and equipment in Daund, dismantling a mobile factory. Three individuals were arrested following raids on multiple locations uncovering illegal production and transportation.
Web Summary : दौंड में अवैध शराब और उपकरण जब्त, जिसकी कीमत ₹85.42 लाख है, एक मोबाइल फ़ैक्टरी को ध्वस्त कर दिया गया। कई स्थानों पर छापे के बाद तीन लोग गिरफ्तार, अवैध उत्पादन और परिवहन का खुलासा।