Maharashtra Rain Update: मान्सून पुन्हा सक्रिय! 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 13:21 IST2022-08-07T13:20:55+5:302022-08-07T13:21:25+5:30
राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत माॅन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय

Maharashtra Rain Update: मान्सून पुन्हा सक्रिय! 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
पुणे : एका आठवड्याच्या खंडानंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. त्यानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी यासह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधारची शक्यता आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाचा, तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत माॅन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, राज्याच्या तिन्ही बाजूंना चक्रावाताची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा आणखी एक पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे अरबी समुद्रावरून पश्चिमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. या अनुकूल स्थितीमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.
शनिवारी सायंकाळपर्यंत कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या पाच दिवसांसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर नाशिक तसेच कोकण व पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.