Maharashtra Police Bharti 2025 : पोलिस भरती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:11 IST2025-11-27T10:09:46+5:302025-11-27T10:11:21+5:30
भरती अर्ज वेळेत भरण्याच्या धास्तीने उमेदवार तणावात

Maharashtra Police Bharti 2025 : पोलिस भरती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ गतीने
बारामती :महाराष्ट्रपोलिस दलामध्ये १५ हजार २९४ पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बॅण्डसमन, कारागृह शिपाई आणि सशस्त्र पोलिस शिपाई (एसआरपीएफ) या पदांचा सामावेश आहे. मात्र, पोलिस भरती ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यातच अर्ज दाखल करण्यास शेवटचे अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत.
या महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच साधरणतः एक महिना इतका कालावधी देण्यात आला होता. या भरती प्रक्रियेसाठी साधारणतः ७ ते ९ लाख उमेदवार दरवर्षी अर्ज दाखल करत असतात. मोठ्या प्रमाणात अर्जदार अर्ज दाखल करत असल्यामुळे संकेतस्थळाच्या सर्व्हरवर बऱ्याच वेळा अतिताण येऊन ते निष्क्रिय होते. तसेच बराच वेळ एक अर्ज भरण्यासाठी लावते. त्यातच एकच उमेदवार पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई, बॅण्डसमन व कारागृह शिपाई या ५ विविध पदांसाठी अर्ज दाखल करतात. परिणामी उमेदवारांच्या अर्जांची संख्या कित्येक लाखांत जाते. त्यामुळे उमेदारांच्या अर्ज दाखल करण्यास नेट कॅफे यांसारख्या ठिकाणांवर उमेदवारांची गर्दी दिसून येते. त्यामुळे दरवर्षी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये संकेतस्थळ व सर्व्हर मंद गतीने चालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज भरला जाईल की नाही, या धास्तीने उमेदवार तणावात आहेत. तरी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी महाराष्ट्रातील उमेदवारांकडून मागणी होताना दिसत आहे.
येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, ही तांत्रिक समस्या दरवर्षीच्या पोलिस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावत असते. या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये लाखो उमेदवार ऑनलाइन अर्ज भरत असल्यामुळे संकेतस्थळ मंदावते. महाराष्ट्रातील उमेदवार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज गेलेत, याचा अंदाज यावा व त्यावरून योग्य जिल्ह्यात अर्ज भरता यावा म्हणून खूप शेवटच्या दिवसांमध्ये अर्ज दाखल करतात आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व्हर व संकेतस्थळ मंदावण्याची ही तांत्रिक समस्या दरवर्षी दिसून येते. तरी दरवर्षीप्रमाणे प्रशासनाने याहीवर्षी उमेदवारांना साधारणतः १५ दिवस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी.