Maharashtra Gram Panchayat Election Results : Defeat to existing members in Khed taluka; Super performance of young faces | Maharashtra Gram Panchayat Election Results : खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना पराभवाची वारी; तरुण चेहऱ्यांची 'विजयी' कामगिरी  

Maharashtra Gram Panchayat Election Results : खेड तालुक्यात विद्यमान सदस्यांना पराभवाची वारी; तरुण चेहऱ्यांची 'विजयी' कामगिरी  

राजेंद्र मांजरे -

राजगुरुनगर: खेड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवणुकीत अनेक ठिकाणी विद्यमान सदस्यांना पराभूत करत मोठया संख्येने तरुण चेहेरे उमेदवार निवडून आले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतमधील आजी माजी पदाधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखविला.तीन ठिकाणी समान मते पडल्याने' टाय ' झाला.चिठ्ठयामुळे उमेदवारांचे भवितव्य ठरले. या निवडणूकीत पैशाचा मोठया प्रमाणात चुराडा  झाला.विजयी उमेदवारांनी व सर्मथकांनी गुलाल भंडाराची उधळण करत आनंद व्यक्त केला.

तालुक्यातील एकुण ८० ग्रामपंचायती करिता  २२३ प्रभागासाठी शुक्रवारी (दि.१५)  ४१३ जागांसाठी मतदान झाले होते . बहुतांश गावामध्ये विविध पक्षांचे संमिश्र पॅनेल होते.तालुक्यातील  कुठल्याच गावात पुर्ण पक्षाचे पॅनेल नव्हते.विजयी उमेदवारांनी आमदार दिलीप मोहिते यांचे कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. 

कडूस ता. खेड येथे अनिकेत धायबर व संजय आरगडे यांना समान ३१२ मते, पोस्टाच्या दोन मतामुळे धायबर विजयी झाले. राक्षेवाडी (ता . खेड) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे खेड बाजार समिती संचालक अशोक राक्षे पाचव्यांदा विजयी आहेत .

वेताळे येथे ग्रामपंचायतील शिवसेनेचे विद्यमान सरपंच बंडू बोंबले फक्त एक मताने निवडून आले तर त्यांची पत्नी सविता बोंबले ३४ मतांनी विजयी झाले.

निमगाव ग्रामपंचायत मध्ये विदयमान सदस्य व माजी सरपंच अमर शिंदे पाटील हे गावच्या इतिहासामध्ये एका प्रभागामध्ये सर्वाधिक ३०० मतांनी निवडून येण्याचा मान मिळवला.मनसेचे तालुकाध्यक्ष संदिप बाळू पवार सावरदरी ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त एक माताने विजयी झाले.

दावडी येथे विद्यमान पंचायत समिती राष्ट्रवादीच्या सदस्या वैशाली गव्हाणे यांचे पती माजी सरपंच  संतोष गव्हाणे यांना पराभवांचा सामाना करावा लागला. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या, कॉग्रेस राज्य कार्यकारिणी सदस्या वंदना सातपुते मोठया मतांच्या फरकाने पराभूत झाल्या.कडुस ग्रामपंचायतीच्या प्रभागदोन मधील संजय पांडुरंग अरगडे आणि अनिकेत धायबर या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३१२ मते पडली असताना पोष्टल दोन मते मिळाल्याने अनिकेत धायबर यांचे नशिब फळाला आले. तर कडुस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य पंडीत मोढवे आणि सुलभा चिपाडे यांना परभवास सामोरे जावे लागले. तर ७६७ विक्रमी सर्वाधिक मते मिळवण्याचा मान लता दत्तात्रय ढमाले यांनी मिळवला.

चाकण येथील मेदनकरवाडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी सरपंच रामदास मेदनकर, त्यांच्या पत्नी सुरेखा मेदनकर, व मुलगा संकेत मेदनकर. हे तिघेही विजयी झाले.

वाफगाव (ता. खेड) येथे उपसरपंच अजय भागवत पराभूत झाले. चिंचबाईवाडीचे विद्यमान पुनम गार्डी यांची यापुर्वी बिनविरोध निवड झाली, मात्र त्यांचे पतीराज माजी सरपंच संतोष गार्डी यांचा निसटता पराभव झाला.

कडधे येथे सदानंद ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी आठ जागा जिंकल्या. कॉन्ट्रॅक्टर जयसिंग भोगाडे हे खरपुडी तर सतिश नाईकरे हे कमान येथून विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीत दोन एकामेकाविरोधातील मतांच्या मोठा फरकाबाबत शंका उपस्थित केल्याने पुन्हा उमेदवारांना कार्यकर्ते ना बँलेट युनिट कंट्रोल युनिटवर फेरमतमोजणी करुन शंका दुर करण्यात आली.

जऊळके ब्रूदुक ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३ मध्ये मीरा संतोष भालेराव व अर्चना लिंबाजी मेंगडे यांना १६१ असे समसमान मतदान पडले असता चिठीद्वारे मीरा भालेराव विजयी झाल्या.

धानोरे ग्रामपंचायतीत सेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांचा पॅनल विजयी झाला.

बिरदवडी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच बाबासाहेब पवार व मोहन पवार विजयी झाले.

सावरदरी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच रेणुका शेटे पराभूत झाल्या.

१३ सदस्यसंख्या असलेल्या चिंबळी ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते विलास कातोरे व बाजार समिती संचालक व शिवसेनेचे नेते पांडुरंग बनकर यांचे पॅनलला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या असून एक अपक्ष निवडून आला.

गोलेगाव ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीचे सदस्य यांचे पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले.वराळे माजी सरपंच बेबीताई बुट्टे पाटील पराभूत झाल्या. मतमोजणी दरम्यान खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्र व व गावागावात पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results : Defeat to existing members in Khed taluka; Super performance of young faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.