Maharashtra government : Legacy of MLAs for not taking a simple oath | Maharashtra government : साधी शपथही घेता न आल्याने आमदारांचा विरस
Maharashtra government : साधी शपथही घेता न आल्याने आमदारांचा विरस

ठळक मुद्देजरुरीपुरते कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलण्याची संधी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदारसंघात जाण्यास जवळपास मनाईच

पुणे : आधी उमेदवार मिळविण्याची लढाई, त्यानंतर निवडून येण्यासाठीची धडपड व आता निवडून आल्यानंतर, तब्बल १८ दिवस झाले, तरी साधी शपथही घ्यायची संधी मिळाली नसल्याने नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा विरस झाला आहे. त्यातच राष्ट्रपती राजवट म्हणजे पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागते आहे की काय, याची धास्ती त्यातील काठांवर निवडून आलेल्यांना बसली आहे.
मुंबईत सध्या सुरू असलेले राजकारण या नव्याने निवडून आलेल्या आमदारांना कळेनासे झाले आहे. विजयाचा गुलाल अंगावर असतानाच आमदारकीची शपथ थेट विधानसभेत घेण्यातील नवेपण त्यांना अनुभवायचे होते. त्यालाच धक्का बसल्याने त्यांच्यातील बरेचजण वैतागले आहेत. त्यातच पक्ष मतदारसंघात जाऊ द्यायला तयार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मतदारसंघात जाण्यास जवळपास मनाईच केली आहे. कोणाचे आमदार जयपूरला, तर कोणाचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले आहेत. जरुरीपुरते कुटुंबीयांशी मोबाईलवर बोलण्याची संधी दिली जाते. पण गावाकडे जायला मात्र मनाईच आहे.
 मुंबईत पाय ठेवल्यापासून त्यांचे मतदारसंघात जाणे बंद झाले आहे. सत्तेचा खेळ आज-उद्या संपेल याची त्यांना खात्री होती. त्यामुळेच पहिला आठवडा त्यांना काहीच वाटले नाही, आता मात्र सत्ता कोणाची आलीच नाही, राष्ट्रपती राजवट मात्र लागू झाली यामुळे ते शंकीत झाले आहेत. लगेचच निवडणूक लागली तर काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. त्यातही जे अगदीचनिसटत्या मतांवर निवडून आले त्यांनी तर आता नव्याने निवडणुकीची धास्तीच घेतली आहे. पुन्हा त्या लढाईला तोंड द्यायचे, याचा त्यांच्या अंगावर काटाच येतो आहे.
निवडणुकीच्या आधी त्यातही बरेच जोरात असलेल्या भाजपच्या आमदारांच्या पोटात तर गोळाच आला आहे. बदललेल्या राजकारणात भाजपची लोकप्रियता ओसरली आहे याची कुणकुण त्यांनाही लागली आहे. त्यामुळे त्यांना नव्याने निवडणुकांची जास्त भीती वाटते आहे. राजकारणात आमदार म्हणजे वरची पायरी समजली जाते. 
राज्याच्या राजकारणात प्रवेश होत असल्याने अनेकांना आमदार होण्याची हौस असते. विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेण्याचे स्वप्न अनेकजण राजकारणात पाय ठेवल्यापासून पाहत असतात. आमदार झालो, ते स्वप्न पूर्ण होणार की नाही. आमदार म्हणून मतदारसंघात, राज्यात मिरवता येणार की नाही, याची शंका या आमदारांना भेडसावत आहे.
.........
प्रस्थापित पक्षांची नीतीशून्य वर्तणूक
प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नीतीशून्य राजकारणामुळेच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीची वेळ आली असल्याची टीका आम आदमी पक्षाच्या राज्य शाखेने केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले, ‘युती करून आपण निवडणूक लढवली व आता मुख्यमंत्रिपदासाठी भांडण करून युती मोडत आहोत, यात जनतेने युतीला मतदान केले आहे याचे भानच शिवसेना, भारतीय जनता पार्टीला राहिलेले नाही. मतदारांना गृहीत धरून त्यांनी काडीमोड घेतला आहे. यात जनतेचा विश्वासघात याशिवाय दुसरे काहीही नाही. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनाही जनहितापेक्षा पक्षहित महत्त्वाचे वाटते आहे. शिवसेनेला त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी जाताना काहीही वाटत नाही. त्यांना पाठिंबा द्यायचा सोडून काँग्रेस पक्षहित महत्त्वाचे मानते आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्तेत जाण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. या प्रमुख पक्षांच्या नीतीशून्य वर्तणुकीमुळेच  व्यवस्थित निवडणुका होऊनही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ आली आहे.’ 
 

Web Title: Maharashtra government : Legacy of MLAs for not taking a simple oath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.