Maharashtra Elections 2019 Crowd Cheers For PM Modi During Pune Rally Speech, He Responds With A Gesture | Maharashtra Election 2019 : ...अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन!
Maharashtra Election 2019 : ...अन् मोदींनी भाषण थांबवून पुणेकरांना केलं वंदन!

ठळक मुद्देलोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले.पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाषण थांबवून, पोडियमपासून बाजूला होतं स्टेजवर येऊन मोदींनी नागरिकांना अभिवादन करणं लक्षवेधी ठरलं.

पुणे - गेल्या 70 वर्षांपासून 'एक देश, एक संविधाना'च्या आड 370 कलम येत होतं. हे कलम काढून टाकण्याच्या गप्पा खूप झाल्या. पण कृती कोणी केली नाही, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणताच पुणेकरांनी मोदी मोदीचा जयघोष केला. लोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले.

पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोदी मोदी अशा घोषणा नागरिक सगळ्याच ठिकाणी देत असतात, पण अशा पद्धतीने भाषण थांबवून, पोडियमपासून बाजूला होत, स्टेजवर येऊन अशा पद्धतीने मोदींनी नागरिकांना अभिवादन करणं लक्षवेधी ठरलं.

370 कलम काढून टाकल्याने देश एकसंध झाल्याचे देखील ते यावेळी म्हणाले, तसेच हे कलम काढून टाकणे जम्मू काश्मीर, लढाखच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक होते असेही ते म्हणाले. मोदींचे आगमन होताच भव्य हाराच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थित नागरिकांनी मोदींना अभिवादन केले.

‘‘गेल्या पाच वर्षात देशाला लुटणाऱ्यांना तुरुंगाच्या दरवाजापर्यंत घेऊन आलो आहे. आता त्यांना...’’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पॉज’ घेतला. त्यानंतर कोणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘गरीबांच्या, मध्यमवर्गीयांच्या मेहनतीची पै-पै वसुल होत नाही तोवर तुमचा सेवक शांत बसणार नाही.’’ नवे सरकार आल्यानंतर देशाला लुटणाऱ्यांना  डांबण्यास सुरवात झाली आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर श्रोत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येताच, ‘‘हा सिलसिला येथे थांबणारा नाही. तुम्ही निश्चिंत रहा,’’ या शब्दात त्यांनी आश्वस्त केले.

पुणे जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांनी गुरुवारी (17 ऑक्टोबर) पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, खासदार गिरीश बापट, भाजपाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.

‘मोठी स्वप्ने आम्ही पाहतो. मोठे लक्ष्य आम्ही बघतो कारण आम्ही इमानदार आहोत. इमानदारीने कमावणारा सामान्य करादाता आणि आमच्या मध्यमवर्गाबरोबर सरकार ठामपणे उभे आहे. देशाची अर्थव्यवस्था चालवण्यात मध्यमवर्गाचे योगदान मोठे आहे. त्यासाठीच व्यवस्थेतील अपप्रवृती काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,’’ असे मोदी म्हणाले.

 


Web Title: Maharashtra Elections 2019 Crowd Cheers For PM Modi During Pune Rally Speech, He Responds With A Gesture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.