MAHA TET 2025 Exam : टीईटी गैरव्यवहाराचा शाेध घेत काेल्हापूर पाेलिस पाेहाेचले थेट परीक्षा परिषदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:33 IST2025-11-28T09:33:16+5:302025-11-28T09:33:49+5:30
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फाेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टाेळीला काेल्हापूर पाेलिसांनी ताब्यात घेतले अन् राज्यभर परीक्षेच्या गाेपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित झाला.

MAHA TET 2025 Exam : टीईटी गैरव्यवहाराचा शाेध घेत काेल्हापूर पाेलिस पाेहाेचले थेट परीक्षा परिषदेत
पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फाेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टाेळीला काेल्हापूर पाेलिसांनी ताब्यात घेतले अन् राज्यभर परीक्षेच्या गाेपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित झाला. याची गंभीर दखल घेत काेल्हापूर पाेलिसांनी संशयित आराेपींकडून कसून चाैकशी केली. त्याचबराेबर तपास पथकाने बुधवारी (दि. २६) थेट राज्य परीक्षा परिषद गाठली आणि येथील प्रक्रिया जाणून घेतली. याला राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही दुजाेरा दिला आहे.
प्रश्नपत्रिकेची छपाई करण्याबराेबरच गाेपनीयतेची काळजी कोणत्या पद्धतीने घेतली जाते, याची माहिती घेतली. दुसरीकडे पोलिसांनी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीकडे केलेल्या तपासात टीईटी परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका सापडली नाही. त्यामुळे पेपर फुटला, असा दावा करता येणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षा घेतली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक शिक्षकाला टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्याने यंदा परीक्षार्थ्यांची संख्या सव्वालाखाने वाढली हाेती. दरम्यान, एका टाेळीकडून तब्बल तीन लाख रुपयांना टीईटी प्रश्नपत्रिका विकली जाणार होती. त्यासाठी परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांकडून पैसेही घेतले गेले होते. कोल्हापूर पाेलिसांनी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळींना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली हाेती. या पार्श्वभूमीवर पाेलिसांचे पथक परीक्षा परिषदेकडून सविस्तर माहिती घेतली.
प्रश्नपत्रिका कोणाला छापण्यास दिली जाते. या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रापर्यंत कशा पोहोचवल्या जातात. प्रश्नपत्रिका छापणारी आणि परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवणारी गोपनीय संस्था कोणती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त यांच्याकडून जाणून घेण्यात आले. तसेच २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेचा संच देखील परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी ताब्यात घेतला.
पेपर फोडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचा संच पोलिसांकडे उपलब्ध असता तर दोन्ही संच समोरासमोर ठेवून काही वेळातच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र, पोलिसांनी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आधीच पकडल्यामुळे पेपर हाती लागले नाही. त्यामुळे पेपर फुटल्याचे सिद्ध कसे करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. पकडलेल्या टोळीला प्रश्नपत्रिका कुठून मिळणार होती, या संशोधनाचा विषय असून, यादृष्टीने पाेलिस तपास सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.