चाकण: परिसरात घरगुती गॅसची टंचाई जाणवत असतानाच या परिस्थितीचा गैरफायदा घेत लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या टोळीचा चाकण उत्तर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडीत अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून तब्बल ४९ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण उत्तर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत भोसे (ता.खेड) गावच्या हद्दीत गॅस टँकरमधून अवैधपणे गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले. (दि.३१) रोजी पहाटे सुमारे ४:४० वाजता चाकण-शिक्रापूर रोडवरील इंडेन कंपनीच्या पार्किंगमध्ये पोलिसांनी छापा टाकला. यावेळी या गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय घरगुती गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे उघड झाले. अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकारामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.
या कारवाईत पोलिसांनी अंबादास रोहिदास गाडे (वय ४२, रा. चेंबूर, मुंबई), अक्षय रमेश मुंगसे (वय २५, रा. रासे, ता. खेड) आणि नवनाथ अंकुश होजगे (वय ३४, रा. भोस, ता. खेड) यांना अटक केली. घटनास्थळावरून गॅस टँकर, रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आणि गॅस असा एकूण ४९,५७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. २८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा अवैध आणि जीवघेण्या व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Web Summary : Chakan police exposed an illegal gas refilling operation, arresting three and seizing ₹49 lakh worth of equipment and gas. The suspects were refilling domestic cylinders from a tanker, risking a major accident. The operation took place near Chakan-Shikrapur Road.
Web Summary : चाकण पुलिस ने अवैध गैस रिफिलिंग गिरोह का पर्दाफाश किया, तीन गिरफ्तार, ₹49 लाख का सामान जब्त। आरोपी टैंकर से घरेलू सिलेंडर भर रहे थे, जिससे बड़े हादसे का खतरा था। कार्रवाई चाकण-शिक्रापुर रोड के पास हुई।