पुण्याच्या औंधमध्ये बिबट्याचा ‘माॅर्निंग वाॅक’; शोध घेण्यात अपयश, दाटवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:59 IST2025-11-24T12:58:52+5:302025-11-24T12:59:26+5:30
बिबट्या मुळा नदीकडून बोपोडीमार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून खाद्य मिळविण्यासाठी औंधमध्ये येण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे

पुण्याच्या औंधमध्ये बिबट्याचा ‘माॅर्निंग वाॅक’; शोध घेण्यात अपयश, दाटवस्तीत शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत वाढली असताना आता तो शहरातही येत आहे. रविवारी पहाटे ३.३७ वाजता औंध भागामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्याला वनविभागानेदेखील दुजोरा दिला असून, याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात बिबट्याचा वावर दिसत आहे.
औंधमध्ये बिबट्या आल्याची माहिती समजताच वनविभाग आणि रेस्क्यू टीम त्या परिसरात दाखल झाली. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर सुरू करण्यात आला असून, पथके पूर्ण तयारीत आहेत. बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळे आणि आवश्यक उपकरणांसह सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान, परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहावे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे बिबट्या सोसायटी परिसरात वावरताना दिसत आहे. परंतु, पहाटे ४ नंतर तिथे बिबट्याचे कोणतेही दर्शन झालेले नाही. तरीही पथके रात्रीदेखील परिसरात शोध व देखरेख ठेवणार आहेत. कॅमेरे, ट्रॅप आणि पथकांची गस्त याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर वनविभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात आले. औंधसारख्या दाट वस्तीच्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. त्या परिसरात वनविभागाचे व रेस्क्यूची टीम नजर ठेवून आहे.
शोध घेण्यात अपयश
औंध परिसरात रविवारी पहाटे ३.३७ वाजता बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन विभागाने शोधमोहीम राबवली. मात्र रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा काहीही पत्ता लागला नाही. थर्मल ड्रोन्स, कॅमेरा ट्रॅप्स यांचा वापर करून शोध घेण्यात आला.
वन विभाग म्हणतो, टॉर्च लावा, मोबाईलवर गाणी लावा...
मानवी वस्तीच्या सीमांमध्ये बिबट्यांचे दर्शन घडण्याची प्रकरणे याआधीही घडली आहेत. सध्या बिबट्याचा शहरात वावर वाढला आहे. सांगवी व औंध जवळील मुळा नदीकाठावरील संरक्षण विभागाच्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. वन विभागाचे उपसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले की शहरात बिबट्याचा वावर आढळल्यास नागरिकांनी मोबाईलवर गाणी अथवा टॉर्च लावावा आणि काठीचा आवाज करावा. जेणेकरून बिबट्या मानवी वस्तीपासून दूर निघून जाईल. याशिवाय बिबट्या दिसताक्षणीच वन विभागाला कळवावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वॉचमनने सावध केले नसते, तर...
शनिवारी रात्री पुनीत कुमार व हनुमंत चाकोरे यांची ड्यूटी होती. रविवारी पहाटे ३.३७ च्या सुमारास त्यांना सीसीटीव्हीमध्ये एक प्राणी दिसला. त्यांनी मला तो व्हिडिओ पाठविला. माझी ड्युटी सकाळी ६ वाजता होती. व्हिडिओ बघितल्यानंतर तो बिबट्याच असल्याची मला खात्री पटली. त्यानंतर मी लगेच कामावर आलो. दरम्यान आजुबाजूच्या सर्व सोसायटीच्या नागरिकांना फोन करून माहिती दिली. कारण साडेचारनंतर बहुतेक लोक फिरण्यास बाहेर पडतात. त्यामुळे ते सावध होऊन बाहेर पडले नाहीत, असे आरबीआय क्वार्टर सोसायटीचे वॉचमन तेजस हिप्परकर यांनी सांगितले.
तो परत आल्यामार्गे गेला असावा
बिबट्या मुळा नदीकडून बोपोडीमार्गे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधून खाद्य मिळविण्यासाठी औंधमध्ये येण्याची शक्यता आहे. पहाटे ३:५० वाजल्यानंतर तो कुठेही सीसीटीव्ही व इतरत्र दिसलेला नाही. तो परत आल्यामार्गे गेला असावा. मांजर वर्गातील प्राणी एका ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन भांबुर्डा वनविहारचे वनपाल विशाल यादव यांनी केले आहे.
बिबट्या पहाटे सीसीटीव्हीमध्ये दिसल्यानंतर वॉचमनने सर्व रहिवाशांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस व वनविभागाचे लोक आले. बिबट्या ए बिल्डिंगमागून आम्ही राहत असलेल्या डी बिल्डिंगपर्यंत आला. काही वेळ तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर बसलेला दिसत आहे. नंतर भिंतीवरून उडी मारून पलीकडे सिंध कॉलनीत निघून गेला. - मुकेश परमार, रहिवासी, आरबीआय क्वार्टर.