ओतूर (पुणे जि. ) - जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे चित्र असतानाच माळशेज परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत वाढली आहे. मढ पारगाव येथे गुरुवारी (दि. ३० एप्रिल) मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात घुसून पाच शेळ्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सखाराम महादू चकवे यांच्या गोठ्यात रात्री सुमारे दोनच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला. सुरक्षित कुंपण ओलांडून आत प्रवेश केलेल्या बिबट्याने काही क्षणांतच दोन शेळ्या, दोन पाठी आणि एक बोकड यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. सकाळी गोठ्यातील विदारक परिस्थिती पाहून चकवे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.या हल्ल्यात सखाराम चकवे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतीसोबत पशुपालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी हा मोठा फटका मानला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक वैभव वाजे आणि मदतनीस संजय दुधवडे यांनी पंचनामा केला. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.माळशेज परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. काही दिवस शांतता असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता; मात्र नव्याने घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा भीतीचे सावट पसरले आहे. दरम्यान, वनविभागाच्या उपाययोजनांवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यात बॉयलर कोंबडीचा वापर भक्ष म्हणून केला जातो; मात्र ते बिबट्याचे नैसर्गिक भक्ष नसल्याने तो पिंजऱ्याकडे फिरकत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अधिक प्रभावी आणि वैज्ञानिक पद्धतीने सापळे लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात आणि बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
माळशेज परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत; पिंजरा लावूनही हल्ले सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:33 IST
सकाळी गोठ्यातील विदारक परिस्थिती पाहून चकवे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
माळशेज परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत; पिंजरा लावूनही हल्ले सुरू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}