राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा; हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा फटका, वाहतूक पोलीसही हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:22 PM2023-07-25T12:22:10+5:302023-07-25T13:01:27+5:30

गेल्या चार - पाच दिवसांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती

laxity of the National Highways Authority; Thousands of motorists are hit by traffic jams, traffic police are also helpless | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा; हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा फटका, वाहतूक पोलीसही हतबल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा; हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा फटका, वाहतूक पोलीसही हतबल

googlenewsNext

धायरी: मुंबई - बंगळुरू महामार्गावर खड्डे पडल्याने रविवारी स्वामी नारायण मंदिर ते वारजे पुलापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत, म्हणून वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार विनंत्या करून देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

गेल्या चार - पाच दिवसांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी अशाच प्रकारे दिरंगाई करत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने आपले ' काम ' दाखवून दिल्याने पोलिसांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले होते. एवढे घडून देखील महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी या अधिकाऱ्यांना 'कॉन्फिडन्स ' कुठून येतो, हा खरा प्रश्न आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते. साहजिकच महामार्गावर क्षणातच वाहतूक कोंडी होते. भर पावसात वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदार दिवस - रात्र वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्याने वाहतूक पोलीस देखील हतबल झाले आहेत. त्यात आणखी भर म्हणजे इतक्या प्रचंड वाहतूक कोंडीत एखादे अवजड वाहन बंद पडले तर प्रशासनाकडून वेळेवर क्रेन सुद्धा उपलब्ध होत नाही. वाहतूक पोलिसांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणतेच सहकार्य न करण्याचा जणू चंगच बांधला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे अंतर्गत रस्ते 'जाम '

मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वाहनाच्या रांगा बघून बरेच वाहनचालक सेवा रस्त्यावरून आपले वाहन नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नऱ्हे, आंबेगाव, मुख्य सिंहगड रस्ता येथील अंतर्गत रस्त्यावरून वाहनांची संख्या वाढल्याने अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी वाढत आहे. रविवारी नवले पुल, भूमकर चौक,मानाजी नगर, वडगाव पुल, प्रयेजा सिटी ते वारजे/सन सिटी रस्ता याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 

मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची गती मंदावली

वारजे पुल परिसरात महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होते आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याबाबत वारंवार विनंत्या करून देखील त्यावर कोणत्याच प्रकारे त्यांच्याकडून कायमस्वरुपी उपाययोजना केल्या जात नाहीत. - पांडुरंग वाघमारे, सहायक 

पोलिस निरीक्षक, सिंहगड रस्ता वाहतूक विभाग

 पावसामुळे संबंधित ठिकाणी डांबर टिकत नाही. आमची टीम युद्धपातळीवर काम करत आहे. एखादे वाहन रस्त्यात बंद पडले तर क्रेनची देखील सोय करण्यात आली असून हायवे पेट्रोलिंग टीम सुद्धा कार्यरत आहे. - भारत तोडकरी, सल्लागार अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

Web Title: laxity of the National Highways Authority; Thousands of motorists are hit by traffic jams, traffic police are also helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.