HSRP Number Plate: एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:59 IST2025-08-14T19:59:04+5:302025-08-14T19:59:14+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती

HSRP Number Plate: एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार
पुणे : राज्य परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा पाटी’ (एचएसआरपी) २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा अडीच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ही मुदतवाढ अंतिम असून, १ डिसेंबरपासून एचएसआरपी नंबरप्लेट नसणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील २०१९च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पुण्यात एकूण २६ लाखांपेक्षा जास्त वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी रोझमार्टा कंपनीला काम देण्यात आले असून, ही नंबरप्लेट बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, वाहनसंख्या आणि त्या तुलनेत एचएसआरपी नंबरप्लेटची नोंदणी करून ती बसविण्यासाठी लागणारा कालावधी अधिक जात आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.
१९ लाख वाहने ‘एचएसआरपी’विना
आत्तापर्यंत केवळ पावणे आठ लाख चालकांनी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी नोंदणी केली असून, त्यातल्या साडेपाच लाख वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. त्यामुळे नंबरप्लेट बसवून घेण्याचा वेग कमी असून, अजूनही १९ लाख वाहनांनी नोंदणी अर्ज दाखल करणे बाकी आहे. तसेच ज्यांना नंबरप्लेट बसविण्याची तारीख दिली, तिही सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंतची आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याला मुदतवाढ मिळावी याबाबत सर्व स्तरांतून मागणी होत होती. त्यानुसार गुरुवारी परिवहन विभागाने चाैथ्यांदा पुन्हा दि. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणून मुदतवाढ
-राज्यातील २०१९ पूर्वीच्या केवळ १५ ते १७ टक्के वाहनधारकांकडून एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आले आहे.
-मुदत १५ ऑगस्ट असले तरी अनेक वाहनांना सप्टेंबर महिन्यातील अपाॅइंटमेंट मिळालेली आहे.
-ग्रामीण भागात फिटमेंट केंद्रांची संख्या कमी आहेत.
-काही फिटमेंट केंद्रचालकांकडून केंद्र बंद करण्यात आले आहे.
-नागरिकांकडून एचएसआरपी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.