नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:05 IST2025-01-20T13:05:17+5:302025-01-20T13:05:44+5:30
किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये

नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ
धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी भागात मागील काही दिवसांपासून नागरिक जुलाब-उलट्याने बेजार झाले आहेत. दरम्यान पालिकेकडून होणारा दूषित पाणीपुरवठा याला जबाबदार असल्याचे दिसत आहे. शिवनगर भागात नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या येत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. पालिकेच्या संबंधित विभागाकडून मात्र याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. किरकटवाडीतील दवाखान्यांमध्ये दररोज गर्दी दिसत आहे. त्यातील बहुतांश रुग्ण हे जुलाब-उलट्यांनी त्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान दवाखान्यात खर्च करून वैतागलेल्या नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत असल्याने कर भरूनही नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. दूषित पाणीपुरवठ्याची समस्या सध्या गंभीर बनली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पाणी दूषित होण्यामागील कारणांचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
परिसरातील शिवनगर भागातील काही नागरिकांच्या दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आपण नियमितपणे टाकी साफ करत असतो. आता नागरिकांच्या तक्रारीनंतर पाइपलाइनदेखील साफ करण्यात येत आहेत. - नितीन खुडे, उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग
महापालिकेकडे दूषित पाणी येत असल्याच्या वारंवार तक्रारी करूनदेखील तातडीने काम होताना दिसत नाही. महापालिकेला कर भरूनदेखील नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल. - रमेश करंजावणे, उपाध्यक्ष, मनसे खडकवासला मतदारसंघ
उलट्या-जुलाबाने त्रस्त रुग्ण उपचारासाठी आले होते. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. तसेच पाणीपुरवठा विभागाला याबाबत आम्ही कळविले असून नागरिकांनी काळजी घ्यावी. - डॉ. शब्दा शिरपूरकर, आरोग्य अधिकारी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र