Pashan Lake Pune: पाषाण तलावात मोठ्या संख्येने मासे व जलचरांचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, पुणे महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 09:47 IST2026-04-11T09:44:35+5:302026-04-11T09:47:25+5:30
Pashan Lake Pune पाषाण तलावाजवळ असलेला १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरीत्या कार्यरत नसल्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते.

Pashan Lake Pune: पाषाण तलावात मोठ्या संख्येने मासे व जलचरांचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, पुणे महापालिकेची कारवाई
पुणे : पाषाण तलावातील मासे आणि इतर जलचरांच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कडू आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विजय भोईर आणि विनायक चोपडे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाच्या मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पाषाण तलावाजवळ असलेला १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) योग्यरीत्या कार्यरत नव्हता. परिणामी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते. याचा जलचरांवर गंभीर परिणाम झाला आणि मोठ्या संख्येने मासे व इतर जलचरांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचली नाही, तर आसपासच्या परिसरातील सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण झाला होता.
हा प्रकल्प १५ व्या वित्त आयोगांतर्गत बांधण्यात आला होता; परंतु तो पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हता. तपासात असेही दिसून आले. जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिका प्रशासनाने संबंधित मुख्य अभियंत्यांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे. या निष्काळजीपणाबद्दल खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्यास, त्यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल. या प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कडू आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विजय भोईर आणि विनायक चोपडे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मुख्य अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस
महापालिकेच्या प्राथमिक तपासात तलावालगत उभारण्यात आलेले सुमारे एक एमएलडी क्षमतेचे १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले आहे. तसेच या केंद्रातून प्रक्रिया न केलेले मैलापाणी थेट पाषाण तलावात सोडण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाच्या मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. समाधानकारक खुलासा न दिल्यास पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.