Sheetal Tejwani: स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री; शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:23 IST2025-12-04T11:23:03+5:302025-12-04T11:23:36+5:30
Sheetal Tejwani Arrest: या प्रकरणात शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी फसवणूक करण्यात आली. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे

Sheetal Tejwani: स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री; शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे आली समोर
Pune Land Scam: मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणेपोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणेपोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. पोलिस चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणीदेखील झाली. मीडिया ट्रायलमुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा तेजवानीने याचिकेत केला होता, तसेच बोपोडी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता. जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी बावधन पोलिस ठाण्यात दिग्विजय पाटील, शीतल मेजवानी आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनीदेखील यात उडी घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
१८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी
पुण्यात मुंढवा येथील १८०० कोटींची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने केवळ ३०० कोटींमध्ये घेतली, तसेच यासाठी मुद्रांक शुल्क म्हणून केवळ ५०० रुपये मोजल्याचा आरोप करण्यात आला होता, तसेच २१ कोटींचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचेदेखील समोर आले होते. सहजिल्हा निबंधकांच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी वसुलीची नोटीस बजावली होती. विशेष म्हणजे, पार्थ पवारांनी या जागेवर आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते? असा सवालही या निमित्ताने विरोधकांकडून उपस्थित केला. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने इरादा पत्र दिले होते. त्यानंतर कंपनीने मुद्रांक शुल्कात सवलत मागितली होती. प्रत्यक्षात ७ टक्क्यांपैकी ५ टक्के सवलत घेऊन २ टक्के मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने केवळ ५०० रुपयांचे शुल्क भरून २१ कोटींचे शुल्क बुडवले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
शीतल तेजवानीला अटक करण्याची कारणे...
शीतल तेजवानीने शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार यांच्याकडून कागदपत्रे तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केली. या प्रकरणात शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी फसवणूक करण्यात आली. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा सातबारा उतारा बंद असतानाही व्यवहाराच्या वेळी तो जोडला होता. शीतल तेजवानीविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. याबाबत तेजवानी यांची चौकशी करून त्यांच्याकडून खुलासा पोलिसांनी मागितला होता. तेजवानीला अटक केल्यामुळे पोलिस तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
कोण आहे शीतल तेजवानी?
शीतल तेजवानी आणि सागर सूर्यवंशी हे दाम्पत्य सेवा विकास बँकेतील तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. सागर सूर्यवंशी यांनी पत्नी शीतल तेजवानी आणि तिच्या कुटुंबीयांच्या नावे ४१ कोटी रुपयांची १० कर्जे घेतली. या सर्व कर्जांसाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. ही कर्जे सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखांमधून उचलण्यात आली आहेत.