Purandar: जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:28 IST2025-07-29T18:28:13+5:302025-07-29T18:28:57+5:30
या प्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

Purandar: जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
सासवड: पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील शेतकरी शंकर नारायण लोणकर (वय ५४) यांनी जमिन खरेदी विक्री व सावकारी व्याजाच्या मानसिक त्रासाला कंटाळून कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल दादासाहेब कामठे, दादासाहेब कामठे (दोघे रा.येवलेवाडी, पुणे) आणि जालिंदर निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवरी (ता.पुरंदर) शेतकरी शंकर लोणकर यांनी एप्रिल २०२४ मध्ये भिवरी येथील ५ गुंठे शेती विक्रीस काढली होती. हा व्यवहार सतरा लाख पन्नास हजार रूपयांना ठरला होता .यापैकी व्यवहारासाठी आरोपींनी शंकर लोणकर यांना ९ लाख रुपये दिले होते. परंतु फिर्यादी यांनी ऊर्वरीत १३ लाखांची मागणी करून ते दिल्यानंतरच विसार पावती करून देतो असे म्हणाले. परंतु उर्वरित रक्कम देण्याऐवजी ४.५ लाख रुपयांचे अवाजवी व्याजाची मागणी केली. लोणकर यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिल्यानंतर देखील इसार पावती रद्द करण्यात आली नाही. यानंतर आरोपींनी आणखी ४ लाख रुपयांची मागणी करीत १६ गुंठे जमिनीवर ताबा घेतला जाईल, शिवाय जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या गेल्या.
या मानसिक त्रासामुळे लोणकर यांनी रविवारी (दि. २७) सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर सासवड येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. प्रशासनाने अशा प्रकांरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.