कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:40 IST2025-11-15T09:40:20+5:302025-11-15T09:40:36+5:30
संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला

कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन
आळंदी: श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शनिवारी (दि.१५) मध्यरात्री बाराला सुरुवात झाली. संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. या विधिवत पूजेसमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते. माऊलींना नैवद्य दाखवून सनई चौघड्याच्या तालात आरती घेण्यात आली.
महापूजेसाठी आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, डॉ.भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ऍड. रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, रामभाऊ चोपदार, मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलीस निरीक्षक भिमा नरके, अजित वडगावकर, डी. डी. भोसले, राहुल चव्हाण, ऍड. विष्णू तापकीर आदींसह आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते.
बेरे दाम्पत्यांला मिळाला पूजेचा मान
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२९ व्या संजीवन समाधीच्या महापूजेचा मान शंकर गणू बेरे व निर्मला शंकर बेरे (रा. सावरोली बुद्रुक ता. शहापूर) या वारकरी दांपत्याला मिळाला. महापूजेचा मान मिळाल्याने शंकर बेरे म्हणाले, आमच्यावर माऊलींची कृपा झाली. पाच तासांहून अधिक वेळ आम्ही दर्शनरांगेत उभे होते. आमचा व्यवसाय शेती आहे. मागील दोन वर्षांपासून कार्तिकी वारी करत आलो आहे. माऊलींची कृपा असल्याने हा योग घडून आला. सर्वांना सुखी ठेव असे मागणे माऊलींकडे मागितले आहे. देवस्थान विश्वस्तांच्या हस्ते नारळ - प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.