Video: येळकोट येळकोट जय मल्हार! सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:34 IST2024-12-30T15:32:12+5:302024-12-30T15:34:49+5:30
सदांनंदाचा जयघोष आणि भंडारा खोबर्याची मुक्त उधळण करत पालखीचे कऱ्हा नदीकडे प्रस्थान

Video: येळकोट येळकोट जय मल्हार! सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांची हजेरी
बी.एम. काळे
जेजुरी : मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असल्याने जेजुरीत आज सुमारे चार लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. सदांनंदाचा जयघोष आणि भंडारा खोबर्याची मुक्त हस्ताने उधळण करीत यात्रा पूर्ण करीत होता. या वर्षातील शेवटची यात्रा, पुढील सण २०२५ मध्ये एकही सोमवती यात्रा नसल्याने भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवार पासूनच जेजुरीत येत होता.
रविवारी उत्तररात्री पहाटे ४ वा. सोमवती आमवस्येला प्रारंभ होत असल्याने ग्रामस्थांनी भर सोमवती यात्रेचा निर्णय घेतला होता. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने भाविक जेजुरीत मिळेल त्या वाहनाने येत होते. दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अनिल सौन्दडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ऍड विश्वास पाणसे, ऍड पांडुरंग थोरवे उपस्थित होते.
येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी गडावर लाखो भाविकांची हजेरी, पालखी कऱ्हा नदीकडे रवाना#pune#jejuri#SomvatiAmavasya#khandobayatrapic.twitter.com/LGTkyqBZj1
— Lokmat (@lokmat) December 30, 2024
गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी कूच केले. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीची फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील, व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळ कोट येळकोट जय मल्हार’ , तसेच ‘सदांनंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडार खोबर्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडार्यात न्हाऊन निघाला होता.
तळपत्या सूर्य देवाला साक्षी ठेवत पालखी सोहळा गड कोटातून कऱ्हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकर्यांनी उत्सव मूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलया पेलत गडावरुन शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंच बागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जांनुबाई चौकं मार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळ्याने कऱ्हा नदीकडे कूच केले. भेसळयुक्त भंडारा बंदी आणि महाद्वार पथावरील अतिक्रमणे हटवाल्याने भाविकांनी मोकळा श्वास घेतला. समाधान व्यक्त केले.