गाडी वेडीवाकडी चालवल्याने थांबवून विचारणा; ४ जणांकडून खडकी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:15 IST2025-08-01T21:14:54+5:302025-08-01T21:15:12+5:30
किरकोळ कारणावरून चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला, या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि बेदम झोडपले

गाडी वेडीवाकडी चालवल्याने थांबवून विचारणा; ४ जणांकडून खडकी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री घडली. चर्च चौक खडकी येथे सुमारे रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी जखमी झालेल्या पोलिस शिपायांची नावे असून, ते दोघेही मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनचालकाने गाडी अतिशय वेगात आणि वेडीवाकडी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि बेदम झोडपले.
दरम्यान या प्रकरणी गोपाल देवसिंग कोतवाल यांनी तक्रार दिल्यानंतर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा या आरोपींवर दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.