खडकवासला धरणप्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.२४ टीएमसी पाणीसाठी कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:09 IST2018-11-10T20:08:46+5:302018-11-10T20:09:43+5:30
गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरणप्रकल्पात ३.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

खडकवासला धरणप्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.२४ टीएमसी पाणीसाठी कमी
पुणे : सिंचन विभागातर्फे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेले पाणी तब्बल २०२ कि.मी.चा प्रवास करून इंदापूरात दाखल झाले आहे. सध्या खडकवासला धरणातून १ हजार २५२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले असून खडकवासला धरणप्रकल्पात २३.१४ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रकल्पात ३.२४ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.
कालवा दूर्घटनेमुळे खडकवासला धरणातून शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी तब्बल एक महिना बंद ठेवावे लागले. त्यामुळे दौंड, इंदापूर व बारामतीमधील काही भागातील पिके जळून गेली. पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागात जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणातून शेतीसाठी मुबलक पाणी सोडण्यात आले होते. परंतु, यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी सोडणे अडचणीचे जाणार आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी खडकवासला धरण प्रकल्पात २६.३८ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्ल्क होता. परंतु, यंदा १० नोव्हेंबर रोजी २३.१४ टीएमसी एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने धरणात केवळ ०.२२ टीएमसी एवढेचे पाणी आहे.
महापालिका आणि जलसंपदा विभागाकाकडून कालवा दुरूस्तीच्या कामास विलंब झाल्यामुळे शेत पिकांचे नुकसान झाले.अखेर २८ आॅक्टोबर रोजी कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंतचे कालव्याचे अंतर तब्बल २०२ कि.मी.चे आहे. त्यामुळे २८ आॅक्टोबर रोजी सोडण्यात आलेले पाणी तीन ते चार दिवसांपूर्वी इंदापूरला पोहचले. कालव्यातून काही दिवसांपासून १,२०५ क्यूसेकने पाणी सुरू होते.परंतु,3 नोव्हेंबरपासून १२५२ क्यूसेकने पाणी सोडले आहे.कालव्यातून सोडलेले पाणी केव्हा बंद करणार याबाबतचे स्पष्टिकरण सिंचन विभागाकडून अद्याप देण्यात आलेले नाही.
खडकवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा
धरणाचे नाव टक्केवारी टीएमसी
खडकवासला ६६.२० १.३१
वरसगाव ९५.२८ १२.२२
पानशेत ८८.२७ ९.४०
टेमघर ५.९० ०.२२