कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
By नम्रता फडणीस | Updated: April 23, 2025 21:01 IST2025-04-23T21:00:59+5:302025-04-23T21:01:15+5:30
शिवानी अग्रवालने जामिनासाठी सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरण; शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने तिच्या रक्ताच्या नमुन्यांसह बदलल्याप्रकरणी अटक केलेल्या आई शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षी दि. १९ मे २०२४ रोजी भरधाव वेगाने पोर्शे कार चालवित अल्पवयीन मुलाने दोन अभियंत्यांना उडविले होते.
या प्रकरणात मुलाने मद्यप्राशन केल्याचे समोर येऊ नये यासाठी मुलाचे रक्ताचे नमुने स्वत:च्या रक्ताच्या नमुन्यात बदलले असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने शिवानी अग्रवालला अटक करण्यात आली होती. शिवानी अग्रवालने जामिनासाठी सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, शिवानीने सर्वोच्च न्यायालयात अटकेला आव्हान देत असा दावा केला होता की तिला अटकेच्या वेळी तोंडी किंवा लेखी स्वरूपात त्याची कारणे कळवण्यात आली नव्हती. शिवानी अग्रवालचे वकील विक्रम चौधरी आणि ध्वनी शाह यांनी असा युक्तिवाद केला की, एक महिला आरोपी म्हणून, तिला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.
या प्रकरणात आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे. आणि आरोपी सुमारे १० महिने तुरुंगात आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि तिच्या अटकेच्या कायदेशीरतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील अंतिम आदेश राखून ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने शिवानी अग्रवाल यांना दिलासा दिला.